“अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सत्तेत.. NDA च्या बैठकीत हजेरी लावून आम्ही भूमिका स्पष्ट केली” सुनील तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं

मुंबई – शरद पवारांचे विधान मी ऐकले नाही. सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य मी ऐकले आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सत्तेत आहोत. अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत. पक्षाचा अधिकृत प्रदेशाध्यक्ष म्हणून मी आज आपल्याशी बोलत आहे. एनडीएच्या बैठकीत हजेरी लावून आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. आमच्या दृष्टीने संभ्रम नाही, असे मत अजित पवार गटाचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केले आहे.
अजित पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फुटीबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वादळ उठले आहे. यावरून वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. अजित पवार आमचेच नेते आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट नाही, असे विधान शरद पवार यांनी केले होते.
याबद्दल बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले, शरद पवारांच्या वक्तव्याचे आम्ही स्वागत करतो. आमचीही तीच भूमिका आहे. अजित पवार जसे नेते आहेत, तसे भुजबळ, मुंडेसुद्धा शरद पवार यांचेच कार्यकर्ते आहोत. आम्हीही तेच म्हणतोय. म्हणूनच आम्ही त्यांना भेटलो. पक्षात फूट नाही. फक्त एक गट सरकारमध्ये सहभागी झाला. आता तुम्हीही समर्थन द्यावे एवढंच आमचे म्हणणे आहे. तसेच, पक्ष फुटला नाही म्हणतात तर मग आपल्याच कार्यकर्त्यांना बॅनरवर फोटो लावू नका, असे का म्हणतात, असा प्रश्नही अजित पवार गटाने उपस्थित केला आहे.
अजित पवारांचे नो कॉमेंट्स
शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी “नो कॉमेंट्स’ अशी प्रतिक्रीया दिली आहे. तसेच, मला या विषयावर काहीच बोलायचे नाही. तुम्ही सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर विचारा ना, असे आवाहनच पत्रकारांना केले. सुप्रिया सुळे, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत, त्यात काही वादच नाही. फूट पडणे याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी होते, जर पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला तर, आज तशी स्थिती येथे नाही. असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा संभ्रमात टाकणारे वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याचे अनेक अर्थ लावले जात आहे. शरद पवारांचा अजित पवारांना छूपा पाठिंबा आहे, या आरोपावरही यामुळे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.





