“कुठल्याही परिस्थितीत औरंगजेबाच्या कबरीचं…”; राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या मुद्दयावर फडणवीसांंची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis on Raj Thackeray | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 30 मार्च रोजी गुढीपाडवा मेळाव्यात विविध विषयांवर भाष्य केले. औरंगजेब कबर, संतोष देशमुख हत्या प्रकरण, मराठी भाषा, नदी प्रदूषण या सारख्या अनेक मुद्दयांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधतना राज ठाकरेंनी मांडलेल्या मुद्द्यांवर भाष्य केले. “राज्य चांगलं चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्य चालवताना सर्वांची मदत आणि विश्वासात घेऊन राज्य चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्य चालवताना सर्वांना सोबत घेऊन चालवणे हे आमचं उद्दिष्ट आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
…तर १०० टक्के कारवाई केली जाईल
राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेश सरकारने भोंगे हटवण्याचा निर्णय घेतला, पण महाराष्ट्रात अजूनही भोंगे आहेत, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “नियमांच्या बाहेर जे भोंगे आहेत. त्यांच्यावर १०० टक्के कारवाई केली जाईल आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचं तंतोतंत पालन महाराष्ट्र सरकारकडून केलं जाईल.” Devendra Fadnavis on Raj Thackeray |
कायद्याचं पालन करणं आमची जबाबदारी
राज ठाकरेंनी औरगंजेबाच्या कबरीसंदर्भात मांडलेल्या भूमिकेवर फडणवीस म्हणाले, “या कबरीला एएसआयचं संरक्षण आहे. आम्हाला औरंगजेब आवडो ना आवडो, कायद्याने 50-60 वर्षांपूर्वी त्या कबरीला संरक्षण दिलं आहे. म्हणून त्या ठिकाणी कायद्याचं पालन करणं आमची जबाबदारी आहे. पण कुठल्याही परिस्थितीत औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही”.
राज ठाकरेंनी यावेळी बँकेत मराठी भाषा वापरली जाईल याची खात्री करण्याचा आदेश मनसैनिकांना दिला आहे. मराठी माणूस सध्या असुरक्षित आहे. आमच्या राज्यात येऊन आम्हाला सांगणार असाल की मराठी बोलणार नाही, कानफाट फोडेन त्यांचं. उद्यापासून बँकांमध्ये जाऊन मराठी कारभार होत आहे का हे बघा. नसेल तर त्यांना करायला लावा असा आदेश राज ठाकरेनी दिला आहे. त्यावर फडणवीस म्हणाले की, “ज्या ठिकाणी मराठी वापरणं आवश्यक आहे, तिथे मराठी वापरली गेली पाहिजे हा आग्रह असणं चुकीचं नाही. पण त्यासाठी जर कोणी कायदा हातात घेणं चुकीचं ठरेलं. कायदा हातात घेणार नाही अशी आशा आहे”.
महाराष्ट्रातील नद्या निर्मळ झाल्या पाहिजे असा आमचा प्रयत्न
नद्यांच्या मुद्द्यावर फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्रातील नद्या निर्मळ झाल्या पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. त्याकरिता काही मिशन आम्ही हातात घेतले आहे. हे तात्काळ स्वरूपात होणारी कामे नाही. थोडा वेळ खाणारा आणि खर्चिक कार्यक्रम आहे. मात्र हा केलाच गेला पाहिजे या मताचे आम्ही असल्यामुळे त्याची सुरुवात आम्ही केली आहे. यावेळी आपला कुंभमेळावा होईल त्यावेळी पवित्र गोदावरी नदीत लोक स्नान करतील त्यावेळी त्यांना स्वच्छ पाण्याचा अनुभव कसा देता येईल हा आमचा प्रयत्न राहील,” असा विश्वासही यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केला. Devendra Fadnavis on Raj Thackeray |
हेही वाचा:
Sujata Karthikeyan : भाजपाची सत्ता येताच दिला राजीनामा; कोण आहेत IAS अधिकारी सुजाता कार्तिकेयन ?





