TOP 15: आठ तास काम, हक्काची सुट्टी; महाराष्ट्र वेतन नियम लागू ते माजी मुख्यमंत्र्यांच्या रोड शोदरम्यान अपघात; जाणून घ्या TOP 15 News
TOP 15 News: राज्य, देश-विदेश, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील ताज्या घडामोडी...

TOP 15 News: 1. आठ तासांची कामाची वेळ, साप्ताहिक सुट्टी; महाराष्ट्र वेतन नियम लागू
राज्य शासनाने ‘महाराष्ट्र वेतन नियम, २०२६’ लागू केले आहेत. कामगारांच्या वेतन संरक्षणाला अधिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार महागाई भत्त्यात दरवर्षी १ एप्रिल आणि १ ऑक्टोबरपूर्वी सुधारणा केली जाईल. सामान्य कामकाजाचा दिवस आठ तासांचा, तर आठवड्याची कमाल कामाची मर्यादा ४८ तास असेल.
साप्ताहिक सुट्टी देणे बंधनकारक असून, विश्रांतीच्या दिवशी काम घेतल्यास बदली सुटी आणि सामान्य वेतनाच्या किमान दुप्पट दराने अतिकालिक वेतन द्यावे लागणार आहे. याशिवाय दंडाची कपात करण्यापूर्वी कर्मचाऱ्याला स्पष्टीकरणाची संधी द्यावी लागेल. तसेच कर्मचाऱ्याला वेतनाच्या दिवशी किंवा त्यापूर्वी पे-स्लीप देणे बंधनकारक आहे. तसेच वेतनातून होणारी एकूण कपात एका वेतन कालावधीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक करता येणार नाही.
2. “…तेव्हा जयंत पाटील चीनमध्ये जाऊन तोंड लपवून बसले” पडळकरांची टीका (TOP 15 News)
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला डावलल्याच्या मुद्द्यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. “जिल्हा बँकेची अध्यक्ष निवड होत असताना जयंत पाटील चीनमध्ये जाऊन तोंड लपवून बसले आहेत,” असा टोला पडळकर यांनी लगावला. “सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडी होत असताना जयंत पाटील नेहमी येतात. मात्र, यंदाच्या निवडी सुरू असताना त्यांना थेट चीनमध्ये जाऊन तोंड लपवावे लागले आहे.” जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला बाजूला ठेवल्याच्या पार्श्वभूमीवर पडळकर यांनी ही टीका केली.

TOP 15: आठ तास काम, हक्काची सुट्टी; महाराष्ट्र वेतन नियम लागू ते माजी मुख्यमंत्र्यांच्या रोड शोदरम्यान अपघात; जाणून घ्या TOP 15 News
3. जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर (TOP 15 News)
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. पक्षातीलच काही लोकांनी आपला घात केल्याचा आरोप माजी मंत्री सतीश पाटील यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया देत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
सतीश पाटील यांनी कार्यकर्त्यांसाठी नव्हे, तर स्वतःसह कुटुंबीयांसाठी उमेदवारी मागितल्याचा गंभीर आरोप संजय पवार यांनी केला आहे. एवढेच नव्हे, तर माझा घात केला म्हणता, मग माघार कोणाच्या सांगण्यावरून घेतली, हे जाहीर करा, असे आव्हानही त्यांनी सतीश पाटील यांना दिले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
4. शिवेंद्रराजेंच्या वक्तव्यावरही नो कमेंट्स! जयकुमार गोरेंनाही उदयसिंह पाटलांचं ठाम उत्तर (TOP 15 News)
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते ऍड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी कराडमध्ये प्रीतीसंगम घाटावर जाऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस अभिवादन केले. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेताना मनामध्ये एकच भावना होती की, चव्हाण साहेबांनी जी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक उभी केली आणि त्या बँकेच्या माध्यमातून शेतकरी लोकांना त्यांच्या शेतामध्ये पतपुरवठा व्हावा यासाठी जे काही काम करावे लागणार आहे, ते काम अखंडपणे असेच चालू राहावे अशी अपेक्षा नवनिर्वाचित अध्यक्ष ऍड. उदयसिंह पाटील यांनी व्यक्त केली.
5. दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याला मनसेचा विरोध? (TOP 15 News)
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्यास राज्य शासनाने यापूर्वीच तत्वतः मान्यता दिली असून, केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शनानुसार विधानमंडळाच्या समितीशी संबंधित आवश्यक प्रक्रियेची पूर्तता विधीमंडळ अधिवेशनात करून नामकरणाची कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मात्र मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी याला विरोध केला आहे.
एक्स पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय, “दादरचं नाव बदलताना दादरकरांचं मत विचारात घेतलं गेलं नाही…बाहेरच्या लोकांनी केलेल्या मागणीला दादरकरांवर थोपवत दादरकरांची ओळख पुसण्याचं काम सुरू आहे”, असं म्हणत त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
6. कोपर स्थानकात प्रवाशांचा जीवघेणा स्टंट; MEMU पकडण्यासाठी थेट रेल्वे रुळांवर
दिवा-वसई रेल्वे मार्गावरील कोपर रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. पनवेलहून येणाऱ्या MEMU ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवासी थेट रेल्वे रुळांवर उतरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ट्रेनमधील प्रचंड गर्दीमुळे काही प्रवासी विरुद्ध दिशेने रेल्वे रुळांच्या बाजूला उभे राहत असल्याचे, तर काही जण थेट रेल्वे ट्रॅकवर बसून ट्रेनची वाट पाहत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
या प्रकारामुळे मोठ्या रेल्वे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासन आणि आरपीएफच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रशासन नेमकी काय कारवाई करणार, असा सवाल केला जात आहे.
7. ‘दम होता तर वेगळी स्वतंत्र लढायचं होतं’ जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर टीका
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला सत्तेबाहेर ठेवत मंत्री शंभुराज देसाईंच्या नेतृत्वात शिवसेना-राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली. येथील अध्यक्षपदी राष्ट्रवादीला संधी मिळाली, तर उपाध्यक्ष शिवसेना उमेदवार झाले. साताऱ्यातील अध्यक्षपदाच्या निवडीनंतर आमची जखम भरुन निघाली अशी प्रतिक्रिया शंभुराज देसाईंनी दिली होती. यावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे शंभुराज देसाई यांना, दम होता तर वेगळी निवडणूक लढायची होती, असे म्हंटले. तसेच साताऱ्यातील निवडीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले पाहिजेत जर मुख्यमंत्र्यांनी युती करायचा आदेश दिला नसता तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कधीच सत्तेत आली नसती, असा टोलाही त्यांनी लगावला.
8. ‘बाळासाहेबांचा फोटो फाडणाऱ्या शायना एनसी यांच्यावर कारवाई कधी करणार?’ वैभव नाईक यांचा सवाल
माजी आमदार वैभव नाईक यांनी शायना एनसी यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडण्यात आल्याच्या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. सोनिया गांधी यांच्या पुस्तकाबाबत आम्हाला काहीही म्हणायचे नाही, मात्र बाळासाहेबांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. भाजपच्या सांगण्यावरून शायना एनसी शिंदे गटात काम करत असून, बाळासाहेबांचा अपमान केल्यानंतर त्यांच्यावर काय कारवाई होते, हे आम्हाला पाहायचे आहे, अशी प्रतिक्रिया वैभव नाईक यांनी दिली.
9. नवी मुंबई महापालिकेच्या कारभारावर भ्रष्टाचाराचे आरोप; १५ हजार कोटींच्या कर्जावर राष्ट्रवादीचा सवाल
देशातील स्वच्छ शहरांचा बहुमान मिळवणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक कारभारावर आता भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून राजकीय वातावरण तापलं आहे. महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्या कार्यकाळातील आर्थिक व्यवहारांवर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
१५ हजार कोटी रुपयांचे कर्ज कशासाठी, असा सवाल करत मागील दहा वर्षांच्या खर्चाची श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी पक्षाने केली आहे. रस्ते, गटारे आणि उद्यानांच्या कामांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या मागण्यांसाठी येत्या १ डिसेंबर रोजी नवी मुंबई महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष भरत जाधव यांनी दिली.
10. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी राज्यपाल आज लातूर दौऱ्यावर
राज्यपाल जिष्णू देव वर्मा आज लातूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यातील शेतकरी आणि ग्रामीण भागाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी त्यांचा हा दौरा असणार आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे सकाळी 10 वाजता चाकूर येथील बीएसएफ कॅम्प येथे आगमन होईल. तसेच येथील तलावाची ते पाहणी करतील.
त्यानंतर आनंदवाडी येथे भेट देतील. सकाळी 11.10 वाजता नायगाव येथे येथे भेट देतील. तसेच नायगाव येथील पाझर तलावाची ते पाहणी करतील आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमानंतर ते हेलिकॉप्टरने धाराशिव जिल्ह्यातील नियोजित कार्यक्रमासाठी रवाना होतील. धाराशिव जिल्ह्यातील बलसूर गावाला भेट देऊन ते दुष्काळी परिस्थितीचा आणि स्थानिक समस्यांचा आढावा घेणार आहेत.
11. अखिलेश यादव यांच्या रोड शोदरम्यान अपघात; भाजप नेत्याचा मुलाचा गेला जीव
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या रोड शोदरम्यान भीषण अपघात झाला. बुधवारी अखिलेश यादव यांच्या स्वागतासाठी आलेल्या जेसीबीची धडक बसून भाजप नेते ओंकार सिंह यांचा १४ वर्षीय मुलगा आर्यवर्धन सिंह याचा मृत्यू झाला. स्कूटरवरून रस्ता ओलांडत असताना जेसीबीने त्याला धडक दिली आणि तो रस्त्यावर पडला.
हा अपघात इतका भीषण होता की, भाजप नेत्याच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. आर्यावर्धन दहावीत शिकत होता. या घटनेनंतर नागरिकांनी रस्ता अडवला आणि अखिलेश यादव यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. पीडित कुटुंबीयांनी रोड शोच्या आयोजकांवर तसेच अखिलेश यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
12. खरेदीसाठी ‘सुवर्ण’काळ; वर्षभरात सोने ४४ हजारांनी स्वस्त
मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरा घसरण सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारी २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅममागे २,८०० रुपयांनी घसरून १ लाख ३५ हजार ८०० रुपयांवर आला. तर चांदीचा दर किलोमागे ५ हजार रुपयांनी घसरून १ लाख ६४ हजार ५०० रुपयांवर आला आहे. वर्षभरात सोने ४४ हजार रुपयांनी, तर चांदी सव्वा दोन लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे. जानेवारीत चांदीचा दर किलोमागे ३.८० लाख रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता. आतापर्यंत त्यात २.१५ लाख रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचा दरही १.७६ लाख रुपयांच्या उच्चांकावरून सुमारे ४४ हजार रुपयांनी घसरला आहे.
13. “जगाच्या नकाशावरून इराणचे अस्तित्व मिटवू”; ट्रम्प यांची उघड धमकी
डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधील शेन्झेन येथे इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षासंदर्भात एक निवेदन जारी केले. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीनंतर काही तासांतच ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला. इराण गॅस आणि जैविक शस्त्रास्त्रांवर विचार करत असल्याचे संकेत मिळत असून, ही चांगली गोष्ट नाही. हे लोक खूप धोकादायक आहेत.
जर त्यांनी तसे केले तर अमेरिका त्यांना पूर्णपणे नष्ट करेल. जगाच्या नकाशावरून अस्तित्व मिटवून टाकू, अशी उघड धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिली आहे. याशिवाय इराण संघर्ष संपवण्यासाठी चीन आणि रशियाकडून मदत मागण्याबद्दल विचारले असता ट्रम्प म्हणाले की, ते या देशांकडून मदत मागणार नाहीत. दोन्ही देशांनी अमेरिकेशी चांगले संबंध ठेवले आहेत, असा दावा ट्रम्प यांनी केला.
14. सीएसकेचा ऐतिहासिक निर्णय! धोनीची आयकॉनिक ‘नंबर ७’ जर्सी कायमची निवृत्त
आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या एमएस धोनीच्या अद्वितीय योगदानाचा गौरव करण्यासाठी सीएसकेने(CSK) एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. एका वृत्तानुसार, फ्रँचायझीने धोनीची आयकॉनिक ‘नंबर ७’ जर्सी कायमची निवृत्त केली आहे. २००८ पासून तब्बल १९ वर्षे सीएसकेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि संघाला पाच विजेतेपदे मिळवून देणाऱ्या ‘थला’साठी बीसीसीआयने २०२० मध्ये घेतलेल्या निर्णयाच्या पावलावर पाऊल ठेवत सीएसकेने हा सन्मान दिला आहे. विशेष म्हणजे हा क्रमांक जगभरातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींसाठी एक भावना बनला आहे.
15. ‘आपल्या मुलांसाठी कोणतं भविष्य मागे ठेवून जाणार आहोत?’ वाढत्या प्रदूषणावर सोनमचा सवाल
मुंबईत आयोजित अर्थशॉट प्राइज अवॉर्ड्स २०२६ सोहळ्यात अभिनेत्री सोनम कपूरनेही हजेरी लावली होती. यावेळी तिने वाढत्या प्रदूषणावर भाष्य करत पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित केली आहे. सोनम म्हणाली, “मी या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी येथे आले आहे. देशात जे काही घडत आहे, ते खूपच भीतीदायक आहे. आपल्या मुलांकडे पाहून भीती वाटते की आपण त्यांच्यासाठी कोणतं भविष्य मागे ठेवून जाणार आहोत. मी नुकतंच पाहिलं होतं की आपण गंगा नदी स्वच्छ केली होती.
पण त्यानंतर आपण सर्वांनी ती पुन्हा खूप घाण केली. एक माणूस म्हणून पर्यावरणाची जबाबदारी आपलीही आहे, हे समजून घ्यायला हवं. आपल्या आजूबाजूच्या परिसराची काळजी घेतली पाहिजे. याची सुरुवात आपल्या घरापासून करावी लागेल,” असे आवाहन तिने केले.
हेही वाचा:








