शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन महापालिकेच्या रडारवर

नळ कनेक्शन अधिकृत करण्यासाठी एक महिन्याची मुदत
नगर – नगर महापालिकेने आता शहरातील अनधिकृत नळ कनेक्शनकडे आपला मोर्चा वळवला आहे. शहरातील अनधिकृत नळधारकांना त्यांचे नळ कनेक्शन अधिकृत करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. त्यानंतर मात्र, शहरात विशेष शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत अनधिकृत नळ कनेक्शन आढळल्यास त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल करून थेट फौजदारी कारवाईचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे.
सन 2021-2022 च्या अंदाजपत्रकीय महासभेमध्ये मनपा हद्दीतील अनधिकृत नळ कनेक्शन नियमित करणेबाबत पाणीपुरवठा विभागाने धोरण निश्चित करून नागरिकांना अनधिकृत नळ कनेक्शन नियमानुकूल करणेस उद्युक्त करावे असा निर्णय घेण्यात आला होता. अद्यापही काही नागरिकांकडे अनधिकृत नळ कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी अनधिकृत नळधारकांना त्यांचे नळ कनेक्शन अधिकृत करण्यासाठी एक महिन्याची मुदत महापालिकेने दिली आहे. या कालावधीत त्यांचेकडून 6,700 रुपये इतकी रक्कम भरून नळ कनेक्शन अधिकृत करून घेण्यात यावे, अशा सूचना दिल्या आहेत.
ही मुदत संपल्यानंतर मालमत्ता कर आकारणी करणारे सर्व प्रभागाकडील कर्मचाऱ्यांमार्फत विशेष शोध मोहिम राबवून वसुली विभागाकडून उपलब्ध नोंदी व प्रत्यक्षात अस्तित्वात असलेले नळ कनेक्शन शोधून ज्या नागरिकांकडे नळ कनेक्शन अनधिकृत असल्याचे निदर्शनास येईल त्यांचेकडून 7,700 रुपये वसूल करून त्यांच्याविरुद्ध थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिका उपायुक्तांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात दिला आहे. याबाबत काही अडचणी असल्यास संबधितांनी पाणीपुरवठा मुख्य कार्यालय, प्रभाग कार्यालय, प्रभाग अधिकारी, प्रभाग अभियंता यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.





