पुणे जिल्हा | किटकनाशकांची अनधिकृत विक्री करणारा अटक

लोणी काळभोर, (वार्ताहर)- लोणी स्टेशन (कदमवाकवस्ती, ता. हवेली) परिसरात अनधिकृतरीत्या किटकनाशकांचा साठा करून विक्री करणार्यांवर पुणे कृषी आयुक्तालयाच्या दक्षता पथकाने कारवाई करून तब्बल 32 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे.
सचिन रामलिंग नलवडे (रा. लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी नरेंद्र रामचंद्र बारापत्रे (वय. 57, रा. कोनार्क कॅम्पस, विमाननगर, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नरेंद्र बारापत्रे यांना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत एका इमारतीच्या गाळ्यात में महादेश फार्म फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. धाराशिव यांचे एक उप कार्यालय आहे.
आणि तेथून अनधिकृतरित्या किटकनाशके खरेदी विक्री व्यवसाय व साठा करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. दक्षता पथकाने दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला.
तेव्हा इमारतीचे पार्किंगमध्ये किटकनाशके आढळून आली. सचिन नलवडे हा नोंदणी न करता किटकनाशकाची विक्री करीत असल्याचे आढळून आले आहे. तसेच किटकनाशके विक्री केलेल्या शेतकर्यांना विहीत नमुन्यातील खरेदी पावती न देवुन त्यांची फसवणूक केली आहे.
पुणे कृ षी आयुक्तालयाच्या दक्षता पथकाने या ठिकाणाहून 32 लाख 26 हजार रुपयांचा किटकनाशकांचा साठा जप्त केला आहे. तसेच सर्व किटकनाशकांचे नमुने घेऊन मुंबई येथील किटकनाशके चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
ही कामगिरी पुणे कृषी आयुक्तालयाचे अधीक्षक कृषी अधिकारी गोविंद मोरे, कृषी उपसंचालक किरण जाधव, तंत्र अधिकारी सत्यवान नर्हे व हवेली पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुमित शिंदे यांच्या पथकाने केली आहे.



