पुणे | अनधिकृत हॉटेल्स थेट जमीनदोस्त

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही हाॅटेल, पब आणि रेस्टॅरंटच्या अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा केला जात होता.
मात्र,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच अनधिकृत पब, बारवर बुलडोझर चढवा असा आदेश काढला. त्यानंतर महापालिकेने या तक्रारींवरील धूळ झटकत बुधवारी १९ हाॅटेल्सच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. त्यात काही हाॅटेल पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली.
बुधवारी दिवसभरात महापालिकेने बाणेर, कोरेगाव पार्कमध्ये ही कारवाई केली. यामध्ये तब्बल ५६ हजार ६१ चौरस फुटांचे बांधकाम पाडण्यात आले. विशेषत: ज्या भागात कारवाईस दबाव येत होता, त्या भागातही कारवाई झाली आहे.
शहरातील उद्योगपती, लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी शहरात अनधिकृत बांधकामे करून हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब सुरू केले आहेत. पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग,
महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने तेथे बिनधास्तपणे पहाटेपर्यंत मद्यविक्री केली जात आहे. मात्र, फर्गसन काॅलेज रस्त्यावरील ड्रग्स प्रकरणानंतर ऐन अधिवेशनच्या तोंडावर राज्य शासनाची कोंडी होणार आहे.
त्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणी पोलीस आयुक्तांचे कान टोचले. त्यावर महापालिका आणि पोलीस सक्रीय झाले आहेत. दोन दिवसांत तब्बल १ लाख चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.
येथे करण्यात आली कारवाई
बाणेर-बालेवाडी : द कार्नर लाऊंज बार, एमएल सिटोबार, ईस्को बार, इलीफ्ट बार, ब्रीव्ह मर्चंट कॅफे, उरबो किचन बार, नेटीव बार, फिलेमिट बार, थ्रीमिस्टेक टर्स, डॉक यार्ड.
कोरेगाव पार्क : ग्रेडमामस, दबाबा शाब, प्रिम रेस्टॉरंट, टेल्ली बार, शिवाजीनगर सोशल हॉटेल आदी ठिकाणी कारवाई करण्यात आली.





