पिंपरी | चिखली परिसरात अघोषित भारनियमन

पिंपरी, (प्रतिनिधी) – चिखली परिसरात दिवसराभ विजेचा लपंडाव सुरु आहे. कधीही वीज जाते आणि कधीही येते. शनिवारी (दि. १५) सकाळी नऊ वाजता खंडित झालेला वीज पुरवठा सांयकाळी सहा वाजता पूर्ववत झाला. त्याचा फटका या भागातील शेकडो लघु उद्योजकांना बसला असून त्यांचे काम दिवसभर ठप्प झाल्याने त्यांच्यावर आर्थिक नुकसान सहन करण्याची वेळ आली. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भाजपाच्या वतीने महावितरणच्या अधिका-यांना देण्यात आला आहे.
यासंदर्भात पूर्णानगर येथील महावितरण कार्यालयामध्ये शहर भाजपच्या वतीने महावितरणचे कनिष्ठ अभियंता विकास पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिखलीतील पुर्णानगर, कृष्णानगर, घरकुल, नेवाळे वस्ती यासह अन्य भागात दिवसभरात किमान चार ते पाच वेळा वीज पुरवठा खंडित होत आहे.
पूर्णानगर सब स्टेशन कार्यालयातून वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. वीज पुरवठा खंडित होऊ लागल्याने चिखली परिसरात नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे. तसेच या भागातील शेकडो लघु उद्योगाचे काम ठप्प होत होऊन आर्थिक नुकसान होऊ लागले आहे. नागरिक उष्णतेने हैराण झाले आहेत.
या भागातील पावसाळी दुरुस्तीचे काम लवकरात लवकर करून घ्यावे, आठवड्याच्या गुरुवारी दुरुस्ती कामे करावीत. नागरिक सहकार्य करतील. यात सुधारणा झाली नाही तर, नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा दिला आहे.
निवेदन देताना भाजपचे जिल्हा सरचिटणीस अजय पाताडे, शहर उपाध्यक्ष पोपट हजारे, प्रभाग अध्यक्ष संतोष ठाकूर, मंडल सरचिटणीस गोरख पाटील, सागर देसाई, मनाली पताडे, कार्तिक धुरी, मेहेश मांडवकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.





