शेतात जेवणाची वेळ ठरली मृत्यूची: वीज पडून दोन महिलांचा मृत्यू, पाच जखमी

नागपूर: रामटेक तालुक्यातील मौजा सोनेघाट येथे गुरुवारी दुपारी एक दुर्दैवी घटना घडली. शेतीच्या कामानंतर जेवणासाठी बसलेल्या महिलांवर अचानक वीज कोसळल्याने दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रमेश जगन्नाथ राहते यांच्या शेतात सुमारे 25 महिला शेतीचं काम करत होत्या. दुपारी दोनच्या सुमारास काम थांबवून त्या जेवणासाठी बसल्या असताना अचानक वीज कोसळली. या घटनेत मंगलाबाई जीवन मोटघरे (रा. परसोडा) आणि वर्षा देवचंद्र हिंगे (रा. भोजापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींमध्ये जयश्री आकाश जवादे, रंजू राजू अष्टेकर, वनिता गजानन नागरीकर (सर्व रा. रामाळेश्वर वॉर्ड, रामटेक), तसेच कलाबाई कवडू वरघणे आणि प्रमिला वासुदेव आष्टनकर (दोघी रा. भोजापूर) यांचा समावेश आहे. सर्व जखमींना तातडीने रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेच्या वेळी परिसरात पावसाचं वातावरण होतं, मात्र वीज कोसळण्याचा कोणताही पूर्व इशारा नव्हता. अचानक आलेल्या या संकटाने गावकऱ्यांना धक्का बसला आहे. रामटेकचे तहसीलदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हवामान खात्याच्या इशाऱ्यांनुसार सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.





