Umesh Patil : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर शरद पवार आणि अजित पवार गटातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसून येतात. त्यातच काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या पक्षातील योगदानाविषयी वक्तव्य केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरून अजित पवार गटातील नेत्यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे.
शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांनी पक्षासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करत त्याचे पक्षात काय योगदान आहे हे सांगितले होते. त्यावर अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधत जर सुप्रिया सुळे यांच्याकडे एवढी पात्रता असती तर सर्व आमदार आज त्यांच्या पाठीशी उभे असते असे म्हणत सडकून टीका केली आहे.
काहीना काही योगदान असेल ना? – शरद पवार ( Umesh Patil on supriya sule )
शरद पवार यांनी, “मला लोक सांगायचे सुप्रिया सुळे तिसऱ्यांदा निवडून आल्या असून त्यांना संधी द्या. मात्र, पात्रता असताना देखील स्वत:च्या मुलीला बाजूला ठेवून कार्यकर्त्यांना संधी दिली. सलग आठवेळा सुप्रिया सुळेंना संसदरत्न मिळाला. काहीना काही योगदान असेल ना?” असे म्हटले होते.
…तर ४३ आमदार त्यांच्या पाठीशी उभे राहिले असते ( Umesh Patil on supriya sule )
दरम्यान, शरद पवार यांच्या याच विधानावर उमेश पाटील यांनी आपली तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी “अजित पवारांच्या पाठीशी ५४ पैकी ४३ आमदार आहेत. सुप्रिया सुळेंची पात्रता असती, तर ४३ आमदार त्यांच्या पाठीशी उभे राहिले असते. सिंह कन्या राशीत अनेक वर्षापासून झुकलेला होता. सिंह कार्यकर्त्यांच्या राशीतून कन्या राशीत गेल्याने हा गृहदोष निर्माण झाला आहे.” अशी खोचक प्रतिक्रिया यावेळी उमेश पाटील यांनी दिली आहे.