करोनाच्या वाढत्या संक्रमणाने उंब्रजकर भयभीत

दिलीपराज चव्हाण
उंब्रज –करोनामुक्त झालेल्या उंब्रजमध्ये महामारीने पुन्हा तोंड वर काढले आहे. पुणे- मुंबईसह बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या करोना बाधितांचा फटका उंब्रजच्या स्थानिक नागरीकांसह प्रशासनाला बसत आहे. शनिवार दि. 22 रोजी जळगावहून आलेल्या 58 वर्षीय व्यक्ती करोनाबाधित असल्याचे समोर आल्याने उंब्रजला हायअर्लट करण्यात आले आहे.
जळगाव येथील एका गावातील सोने-चांदीचा व्यवसाय करणारी व्यक्ती काही दिवसांपूर्वी उंब्रजमध्ये आली. त्याची तब्येत बिघडल्याने तो खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी गेला. परंतू, त्या डॉक्टरांनी सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिल्यानंतर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंतर कृष्णा हॉस्पीटल असा प्रवास करून तो उपचारासाठी दाखल झाला. शनिवार दि. 23 रोजी त्याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या निकट सहवासीत 5 जणांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर लो रिस्क असणाऱ्या 7 जणांना होम क्वारंटाइन केले आहे. आतापर्यंत उंब्रजची करोना पॉझिटिव्ह रूग्ण संख्या 6 वर पोहोचली आहे.
उंब्रजमध्ये कराडसह पाटण तालुक्याच्या ग्रामीण भागातील लोक व्यापार तसेच खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे उंब्रजच्या बाजापेठेत नेहमीच गर्दी पहावयास मिळाते. बॅंका, शासकीय कार्यालये, पोलीस ठाणे, दवाखाने आदींच्या कामासाठी दैनंदिन उंब्रज बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांचा राबता मोठा आहे.
डेरवणच्या करोनाबाधित बाळावर उपचार करणारे बालरोग्य तज्ज्ञ, उपजिल्हा रूग्णालयातील परिचारीका यांच्यासह पाच जण करोना पॉझिटिव्ह झाले आणि उपचारानंतर ते पूर्णपणे बरेही झाले मात्र, जिल्हा बाहेरून आलेल्या करोनाबाधित रूग्णाने उंब्रजकरांच्या काळजाचा ठोका वाढवला आहे. तो राहत असलेला कॉलेज रोडला असणाऱ्या एका अपार्टमेंट नजीकचा परिसर सूक्ष्म कंटेनमेंट झोन म्हणून सील केला आहे.





