उंब्रज – जुन्या भांडणाच्या रागातून एकाला जीवे मारण्याच्या उद्देशाने बंदुकीतून गोळीबार करून मारहाण करणाऱ्या चार संशयितांना उंब्रज पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मंगळवारी (दि. 18) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयितांकडून बंदूक, रिकाम्या पुंगळ्या आणि दुचाकीसह 1 लाख 71 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अटक केलेल्या चारही संशयितांना कराड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सोन्या ऊर्फ ऋषिकेश गुलबा सूर्यवंशी, मकरंद गुलबा सूर्यवंशी (दोघेही रा. सूर्यवंशी मळा, चरेगाव, ता. कराड), पुंजाराम सुखदेव पाखरे (सध्या रा. सूर्यवंशी मळा, मूळ रा. पोकळवड, जि. जालना) आणि राज अकुंश आवळे (रा. खालकरवाडी, ता. कराड). अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भवानवाडी गावच्या हद्दीत फिर्यादीच्या ऊसतोड कामगाराचा संशयित मकरंद सूर्यवंशी याच्या ट्रॅक्टर ड्रायव्हर पुंजाराम पाखरे याच्याशी जुन्या भांडणाचा वाद होता. या रागातून संशयितांनी मिळून हल्ल्याचा कट रचला. मंगळवारी रात्री स्कुटी आणि बुलेटवरून आलेल्या संशयितांपैकी सोन्या ऊर्फ ऋषिकेश सूर्यवंशी याने बंदुकीतून फिर्यादीवर गोळी झाडली. गोळी फिर्यादीच्या कानाजवळून गेली आणि तो थोडक्यात बचावला. याच वेळी मकरंद सूर्यवंशी आणि पुंजाराम पाखरे यांनी फिर्यादीचा ऊसतोड कामगार मुकेश पतीराम पाटील याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर ऋषिकेश सूर्यवंशी याने हवेत चार राउंड फायरिंग करून परिसरात दहशत पसरवली. “तुला आज रात्री जिवंत ठेवणार नाही,” अशी धमकी देऊन संशयित पसार झाले. घटनेची तक्रार उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संशयितांना अटक केली. गुन्ह्यात वापरलेली बंदूक, रिकाम्या पुंगळ्या आणि दुचाकी जप्त करून 1 लाख 71 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणाचा तपास स.पो.नि. रविंद्र भोरे करत आहेत.