Umar Khalid : उमर खालिदला सर्वोच्च न्यायालयाचा दणका! ‘ती’ याचिका फेटाळली
२०२० मधील दिल्ली दंगल कटाप्रकरणी अटकेत असलेला कार्यकर्ता उमर खालिद (Umar Khalid) याला सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे.

Umar Khalid : २०२० मधील दिल्ली दंगल कटाप्रकरणी अटकेत असलेला कार्यकर्ता उमर खालिद (Umar Khalid) याला सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. खालिदने त्याच्या जामीन नाकारण्याच्या निर्णयाविरोधात दाखल केलेली पुनर्विलोकन याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने हा निर्णय देताना स्पष्ट केले की, खालिदविरुद्ध लावण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे मानण्यासाठी पुरेशी कारणे उपलब्ध आहेत. ५ जानेवारी २०२६ रोजी न्यायालयाने उमर खालिदचा जामीन अर्ज फेटाळला होता.
या निर्णयामध्ये कोणतीही कायदेशीर त्रुटी किंवा उघड अन्याय झाला नसल्याचे निरीक्षण नोंदवत खंडपीठाने १६ एप्रिल रोजी ही याचिका फेटाळून लावली. विशेष म्हणजे, खालिदने या प्रकरणी खुल्या न्यायालयात सुनावणी घेण्याची केलेली विनंतीही न्यायालयाने अमान्य केली असून, चेंबरमध्येच कागदपत्रांची पडताळणी करून हा निकाल देण्यात आला आहे.
फेब्रुवारी २०२० मध्ये सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसी विरोधातील निदर्शनांदरम्यान ईशान्य दिल्लीत उसळलेल्या भीषण हिंसाचारात ५३ जणांचा मृत्यू झाला होता, तर ७०० हून अधिक जण जखमी झाले होते.
या दंगलीचा कट रचल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी एकूण १८ जणांना अटक केली होती. त्यापैकी आतापर्यंत ११ जणांना जामीन मिळाला असला, तरी उमर खालिद आणि शरजील इमाम यांसारख्या मुख्य आरोपींचा जामीन न्यायालयाने पूर्वीच नाकारला आहे. सर्व आरोपींचे गुन्ह्यातील स्वरूप सारखे नसल्याचे सांगत न्यायालयाने खालिदला दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.






