Umar Khalid: “इतर सहकाऱ्यांना जामीन मिळाला, याचा मला आनंद आणि दिलासा आहे. पण आता तुरुंग हेच माझे आयुष्य बनले आहे,” अशा शब्दांत दिल्ली दंगल प्रकरणातील आरोपी आणि कार्यकर्ता उमर खालिद याने आपल्या भावना व्यक्त केल्या. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने उमर खालिद आणि शरजील इमाम यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर ही प्रतिक्रिया समोर आली आहे. २०२० च्या उत्तर-पूर्वी दिल्ली दंगल कटाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायालयाने स्पष्ट केले की, उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्याविरोधात बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायद्यांतर्गत (UAPA) प्रथमदर्शनी गुन्हा सिद्ध होण्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांना जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला. मात्र, याच प्रकरणात इतर पाच आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने गुलफिशा फातिमा, मीरान हैदर, शिफा उर रहमान, मोहम्मद सलीम खान आणि शादाब अहमद यांना जामीन मंजूर केला आहे. ‘आता हीच जिंदगी…’ उमर खालिदची मैत्रीण बनोज्योत्सना लाहिड़ी हिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर त्यांच्यातील संवादाचा उल्लेख केला आहे. खालिदने तिला सांगितले की, “बाकी लोकांना जामीन मिळाला, याचे मला समाधान आहे. जेव्हा बनोज्योत्सनाने उद्या भेटीला येण्याचे सांगितले, तेव्हा खालिद म्हणाला, ‘नक्की ये, आता हेच माझे जग आहे’.” प्रकरणाची पार्श्वभूमी फेब्रुवारी २०२० रोजी उत्तर-पूर्वी दिल्लीत सीएए (CAA) विरोधी आंदोलनादरम्यान हिंसाचार उसळला होता. या भीषण दंगलीत ५३ जणांचा मृत्यू झाला, तर ७०० हून अधिक नागरिक जखमी झाले होते. शरजील इमामला आॅगस्ट २०२० रोजी, तर उमर खालिदला १३ सप्टेंबर २०२० रोजी अटक करण्यात आली होती. काय आहेत आरोप? या सर्व आरोपींवर दिल्ली दंगलीचा मुख्य कट रचल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर UAPA आणि भारतीय दंड संहितेच्या (IPC) विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. UAPA च्या कलम १६ नुसार, जर एखाद्या दहशतवादी कृत्यामुळे कोणाचा मृत्यू झाला, तर संबंधित आरोपीला फाशी किंवा जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे.