शिक्रापूर : येथील परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीचा मुद्दा गाजत असताना नुकतेच स्थानिकांनी आक्रमक होऊन ट्रॅफिक मुक्त शिक्रापूर कृती समितीच्या माध्यमातून जनआंदोलन केले. यानंतर पोलिसांच्या मध्यस्तीने सर्व विभागाच्या अधिकारी व आंदोलकांची बैठक पार पडली. पुढील महिनाभरात पुणे अहिल्यानगर महामार्गावरील सर्व रस्ता दुरुस्ती करत वाहतूक कोंडीस कारणीभूत कारणांचे निराकरण करण्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागिय अभियंता राहूल कदम यांनी दिली असून पोलिसांनी पुढील आढाव्याची बैठक 10 नोव्हेंबर रोजी घेण्याची घोषणा यावेळी केली. प्रशासनाने वाहतूककोंडी सोडवण्याबाबत लक्ष न घातल्यास व उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ट्राफिक मुक्त शिक्रापूर कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. शिक्रापूर येथे ट्रॅफिक मुक्त शिक्रापूर कृती समितीच्या आंदोलनानंतर आज पोलिसांच्या मध्यस्तीने एक बैठक पार पडली, यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, सरपंच रमेश गडदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागिय अभियंता राहूल कदम, शाखा अभियंता रणजीत दाईंगडे, कार्यकारी अभियंता ओमप्रकाश निला, पुणे महानगर विकास प्राधिकरणचे शाखा अभियंता संकेत बडे, गौतम पटेल, विशाल मापारी, एस टी महामंडळ आगारप्रमुख मनीषा गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, मोहिनी मांढरे यांसह ट्रॅफिक मुक्त शिक्रापूर कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी आंदोलक व अधिकार्यांचा समन्वय साधल्याने दोन्ही बाजुंनी सविस्तर चर्चा झाली तर अतिक्रमणांबाबत स्थानिकांसह रस्ते विकास महामंडळाने रस्ता हद्दी व जागा मालकांचे परतावे याबाबत निश्चित निवेदने दिल्यास सर्व अतिक्रमणे हटविण्याची ग्वाहीही पीएमआरडीएचे वतीने अभियंता संकेत बडे यांनी दिली. शिक्रापूर चाकण चौकातील चाकणच्या दिशेने आणि जे दावे न्यायालयात दाखल आहेत ते भाग सोडून अतिक्रमणे काढण्याचा निर्णयही यावेळी जाहीर करण्यात आला, या बैठकीचे सूत्रसंचलन ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर यांनी केले तर सरपंच रमेश गडदे यांनी सर्वांचे आभार मानले. एक महिन्याने आम्ही मध्यस्ती नसणार – दिपरतन गायकवाड शिक्रापूर येथे झालेल्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागिय अभियंता राहूल कदम यांनी एका महिन्यात ठरल्यानुसार सर्व रस्ता दुरुस्तीची कामे पूर्ण करुन देण्याची ग्वाही दिली. मात्र यावेळी पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या उपस्थितीत कामे न झाल्यास यावेळी जशी आम्ही मध्यस्थी करुन बैठक करुन घेतली तशी कुठलीही बैठक अथवा मध्यस्ती आम्ही करणार नसल्याचे सांगितले.