Ultimate Kho Kho 2022 : गुजरात जायंट्सचा सलग दुसरा विजय

पुणे – अल्टिमेट खो खो स्पर्धेत गुजरात जायंट्स संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत गुजरात जायंट्स संघाने ओडिशा जुगरनट्स संघाचा 54-49 असा पराभव केला. चुरशीच्या लढतीत गुजरात जायंट्स संघाने ओडिशा जुगरनट्सवर 5 गुणांच्या फरकाने विजय मिळवला.
ओडिशा जुगरनट्सने सुरेख सुरुवात करत पहिल्या डावात सुरुवातीला 23-04 अशी आघाडी घेतली. महेश पी. याने पहिल्या सातच मिनिटांत गुजरातच्या तीन गडी बाद करून 8 गुणांची कमाई केली व यामध्ये त्याने दोन डाईव्ह मारल्या. त्यानंतर अनिकेत पोटे व जगन्नाथ दास यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले व सामन्यात गुजरातचे आव्हान कायम राखले. पहिल्या डावात पिछाडीवरून जोरदार कमबॅक करत गुजरातने ओडिशा विरुद्ध 26-25 अशी स्थिती निर्माण केली.
ओडिशा जुगरनट्स संघाने दुसऱ्या डावात पहिल्या सातच मिनिटात 24 गुणांची कमाई करत 49-26, अशी आघाडी मिळवली, पण गुजरातच्या कर्णधार रंजन शेट्टीने कमालीचा खेळ करत संघाला 49-48 अशी स्थिती निर्माण करून दिली.
सामना संपण्यास 90 सेकंद शिल्लक असताना गुजरातच्या रंजन शेट्टीने ओडिशाचा डिफेडरला बाद करून संघाला 54-49 असा सनसनाटी विजय मिळवून दिला.





