युक्रेनच्या सैन्याने कुर्स्क सोडले; रशियाच्या लष्कर प्रमुखांचा दावा

किव्ह : युक्रेनमधील कुर्स्क प्रांतात असलेल्या युक्रेनच्या सर्व सैन्याला तेथून हुसकावून लावण्यात आले आहे. या प्रांतातून युक्रेनच्या सैन्याने पुर्ण माघार घेतली आहे, असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेश्कोव्ह यांनी म्हटले आहे. रशियाचे लष्कर प्रमुख जनरल वालेरी गेरासिमोव यांनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्याबरोबरच्या बैठकीत ही माहिती दिली.
यावेळी रशियाकडून उत्तर कोरियाच्या सैनिकांनी युद्धात भाग घेतल्याचेही पेश्कोव म्हणाले. मात्र युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडून या वृत्तावर वेगळी प्रतिक्रिया देण्यात येते आहे. युक्रेनच्या सैनिकांनी कुर्स्क प्रांतात रशियाच्या सैन्याला रोखून धरले आहे, असे युक्रेनच्या सैन्य दलाच्यावतीने सांगण्यात येते आहे. कुर्स्क प्रांतातील चढाईच्या यशाबद्दल पुतीन यांनी आपल्या सैन्य दलाचे अभिनंदन देखील केले आहे. या प्रांतात युक्रेनची घुसखोरी पुर्णपणे अपयशी ठरली असल्याचे देखील पुतीन यांनी म्हटले आहे.
युक्रेनच्या सैन्याने ऑगस्ट २०२४ मध्ये सीमाभागात जोरदार मुसंडी मारली होती आणि तब्बल १,३०० चौरस किलोमीटरच्या भूभागावर ताबा मिळवला होता. भविष्यात होणाऱ्या शांतता वाटाघाटींसाठी या भूभागावरील नियंत्रण फायद्याचे असेल, असा युक्रेनचा अंदाज होता. मात्र युक्रेनचा हा अंदाज खोटा ठरला आणि २०२५ च्या प्रारंभीच्या काळापासूनच युक्रेनच्या सैन्याला कुर्स्कमधील वेगवेगळ्या आघाड्यांवर माघार घ्यावी लागली आहे.





