किव्ह – युक्रेनच्या लांब पल्ल्यांच्या ड्रोन हल्ल्यापुढे रशियाची हवाई संरक्षण व्यवस्था निष्प्रभ झाली आहे. (Ukrainian long-range drone attacks expose Russian air defenses) सलग दुसऱ्या दिवशी युक्रेनच्या लढाऊ ड्रोनच्या हल्ल्यामुळे रशियाच्या दोन हवाई तळांचे मोठे नुकसान झाले आहे.
युक्रेनच्या सीमेजवळ आणि रशियाच्या हद्दीतील कुर्स्क शहरातील हवाई तळावर युक्रेनच्या ड्रोनने केलेल्या हल्ल्यामुळे झालेल्या मोठ्या स्फोटाचे फोटो रशियाच्या अधिकाऱ्यांनी आज प्रसिद्ध केले. या हल्ल्यामुळे रशियाच्या तेलाच्या साठ्याला मोठी आग लागल्याचे रशियाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मात्र या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
काल युक्रेनच्या सोव्हिएत कालखंडातील ड्रोनने रशियाच्या ईगल हवाई तळाचे मोठे नुकसान केले होते. रशियाच्या या हवाई तळावर रशियाच्या हवाई दलातील बॉम्बर विमानेही होती. मॉस्कोपासून काही तासांच्या अंतरावरील रायझन येथील हवाई तळावर देखील असाच मोठा स्फोट युक्रेनच्या ड्रोननी घडवून आणला होता. युक्रेनने या हल्ल्याची कोणतीही जबाबदारी स्विकारलेली नाही. मात्र या हल्ल्याचे स्वागत मात्र केले होते. या हवाई तळावर सोडण्यात आलेल्या दोन ड्रोनना हवेतच लक्ष्य करण्यात आल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. व्होल्गा नदीवरील सारातोव्हा भागात काही ड्रोन पडली. त्या हल्ल्यात रशियाचे 3 सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे.
कर्नाटकमध्ये गुजरातचीच पुनरावृत्ती होईल – मुख्यमंत्री बोम्मई
रशियाकडून क्षेपणास्त्रांचा मारा
रशियाने गेल्या दोन दिवसांपासून युक्रेनवर नव्याने क्षेपणास्त्रांचा मारा करायला सुरुवात केली आहे. युक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांमधील इमारती आणि पूलांना या क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले आहे. यामुळे पुन्हा एकदा वीज आणि पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. रशियाने एकूण 70 क्षेपणास्त्रे डागली होती. त्यापैकी 60 क्षेपणास्त्रे हवेतच पाडण्यात आल्याचे युक्रेनने म्हटले आहे.