Russia-Ukraine Peace Talks : युक्रेनचे शिष्टमंडळ अमेरिकेत रवाना; युद्धबंदीच्या वाटाघाटी पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा
युद्धबंदीसाठीची ही चर्चा रखडवल्याचा आरोप पाश्चात्य आणि युरोपातल्या देशांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यावर केला आहे.

Russia-Ukraine Peace Talks : रशिया-युक्रेनमधील युद्ध थांबवण्याच्या उद्देशाने अमेरिकेच्या मध्यस्थीने सुरू झालेल्या वाटाघाटी इराणच्या युद्धामुळे काही दिवस रखडल्या आहेत. या वाटाघाटी पुन्हा सुरू होण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून युक्रेनच्या अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ अमेरिकेत रवाना झाले आहे.
अमेरिका आणि रशिया दरम्यानची चर्चा लवकरच पुन्हा सुरू होईल, असे क्रेमलिनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानेही म्हटले आहे. रशिया-अमेरिका आणि युक्रेन या त्रिस्तरिय चर्चेमधून महत्वाच्या मुद्द्यांवर अजून तरी कोणताही ठोस निष्कर्ष निघू शकलेला नाही.
ही चर्चा पुन्हा सुरू होण्याचा आग्रह युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी लावून धरला आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांशी युक्रेनच्या शिष्टमंडळाची चर्चा शनिवारी होण्याची अपेक्षा असल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
पण या चर्चेच्यावेळी रशियाचे शिष्टमंडळ उपस्थित असणार नाही, असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी म्हटले आहे. नव्याने होणाऱ्या त्रिस्तरिय बैठकीचे ठिकाण आणि वेळ अद्याप निश्चित झालेले नाही, असे त्यांंनी सांगितले.
युद्धबंदीसाठीची ही चर्चा रखडवल्याचा आरोप पाश्चात्य आणि युरोपातल्या देशांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यावर केला आहे. शांतता चर्चा सुरू असतानाच युक्रेनवर मोठे हल्ले करून जास्तीत जास्त भूभाग ताब्यात मिळवण्याचा प्रयत्न रशिया करत आहे, असा आरोप होतो आहे. रशियाने युक्रेनच्या २० टक्के भूभागावर ताबा मिळवला आहे.






