किव्ह :– रशियाने बेकायदेशीर सार्वमताद्वारे बळकावलेल्या झापुरझ्झिया प्रांतातील मेलिटोपोल शहरावर युक्रेनने शनिवारी (Ukraine launches missile attack on Russian-occupied Melitopol) जोरदार मारा केला. रशियाने नियुक्त केलेल्या प्रशासनाने आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
युक्रेनच्या माऱ्याबाबत दोन्ही बाजूंकडून दुजोरा मिळाला असला तरी या माऱ्यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल भिन्न दावे करण्यात येत आहेत. झापुरझ्झिया प्रांताच्या दक्षिणेकडील मेलिटोपोल शहरामध्ये युद्ध सुरू होण्यापूर्वी दिड लाख लोकसंख्या होती. आता हे शहर रशियाने सार्वमताद्वारे आपल्या भूभागाला जोडून घेतले आहे.
युक्रेनच्या सैन्याने शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास अमेरिकेच्या बनावटीच्या हिमार्स या लांब पल्ल्याच्या रॉकेट लॉंचरचा मारा करण्यात आला असल्याचे रशियाने नियुक्त केलेल्या स्थानिक प्रशासनाच्या प्रमुखांनी म्हटले आहे. मेलिटोपोल शहराच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या मनोरंजन केंद्रावर हा मारा झाला. त्यात दोघे जण ठार झाले आणि 10 जण जखमी झाले, असे या धिकाऱ्याने म्हटले आहे. युक्रेनची दोन रॉकेट पाडण्यात यश आले आहे. असेही या अधिकाऱ्याने एका फोटोच्या सहाय्याने म्हटले आहे.
तर दुसरीकडे युक्रेनच्या रॉकेटनी रशियाच्या लष्करी तळांवर मारा केला आणि त्यात अनेक रशियन सैनिक मारले गेले असल्याचे युक्रेनच्या माजी महापौरांनी म्हटले आहे. मात्र युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही.