सिनेटकडून रखडलेली युक्रेन, इस्रायलची मदत मंजूर; रात्रभर संसद सदस्यांमध्ये झाली चर्चा

वॉशिंग्टन – युक्रेन आणि इस्रायल आणि तैवानला देण्याच्या ९५.३ अब्ज डॉलरच्या आर्थिक मदत पॅकेजला अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने अखेर मंजूरी दिली आहे.
या पॅकेजला मंजूरी देण्याबाबत अमेरिकेच्या संसदेत उभे तट पडले होते. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या मुद्यावरून रिपब्लिकन पक्षातच दोन गट पडले होते. त्या मुद्यावर दीर्घकाळापासून चर्चा सुरू होती.
युक्रेनला देण्याच्या ६० अब्ज डॉलरच्या मदतीला संसदेतील एका छोट्या गटाने विरोध केला होता. त्यावर रात्रभर जोरदार चर्चा झाली. अमेरिकेने परदेशाला मदतीसाठी निधी पाठवण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करावे, असे विरोधकांचे मत होते.
परंतु डझनहून अधिक रिपब्लिकनांनी जवळजवळ सर्व डेमोक्रॅट्ससह पॅकेजच्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्यामुळे हे पॅकेज ७० विरुद्ध २९ अशा फरकाने मंजूर झाले.
युक्रेन सोडल्यास रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना प्रोत्साहन मिळू शकते आणि जगभरातील राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असा युक्तिवाद पॅकेजच्या समर्थकांनी केला.
केवळ अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेशी नव्हे तर अमेरिकेच्या मित्र देशांच्या सुरक्षेशी संबंधित हा मुद्दा असल्याचे यावेळी ठासून सांगण्यात आले. अध्यक्षीय निवडणूकीच्या शर्यतीत असलेले माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी या पॅकेजला सर्वाधिक विरोध केला होता.





