Russia-Ukraine War : रशियाकडून युक्रेनमध्ये ड्रोन, क्षेपणास्त्रांचा मारा; १५ ठार ,११६ जखमी

Russia-Ukraine War : रशियाने युक्रेनवर केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माऱ्यात किमान १५ जण ठार झाले आणि ११६ जण जखमी झाले आहेत. रशियाने राजधानी किव्हवर रात्रीच्यावेळी केलेल्या या हल्ल्याच्यावेळी स्थानिक नागरिक झोपेतच होते.
या बॉम्बफेकीमुळे राजधानी किव्हमधील ९ मजली इमारत कोसळली असून डझनभर अन्य इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. किव्हमध्ये १४ जण ठार आणि ९९ जण जखमी झाले असल्याचे किव्ह शहराच्या लष्करी प्रशाससकांनी सांगितले.
याशिवायरशियाने युक्रेनच्या दक्षिणेकडील ओडेसा या बंदराच्या शहरावर देखील ड्रोनचा मारा केला. त्यात एक ठार झाला आणि १७ जण जखमी झाले. रशियाच्या सैन्याने रात्रीभरात युक्रेनवर ४४० पेक्षा जास्त ड्रोन आणि ३२ क्षेपणास्त्रे डागली.
रशियाने थेट नागरी वसाहतींवर हा हल्ला केला. जवळपास ९ तास हा ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा सुरू होता. एकूण २७ ठिकाणी रशियाने ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली. स्वियातोशिंस्की आणि सोलोमियान्स्की या जिल्ह्यातही काहीजण जखमी झाले आहेत. या माऱ्यात जखमी झालेल्यांमध्ये अमेरिकेच्या एका नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.
रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांना हे युद्ध सुरू ठेवणे परवडत असल्याने त्यांनी हे हल्ले केले आहेत. त्यांना हे युद्ध असेच सुरू ठेवायचे आहे. मात्र त्याकडे संपूर्ण जग डोळेझाक करते आहे, हे त्रासदायक आहे, असे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
कॅनडामध्ये होत असलेल्या जी-७ गटाच्या शिखर परिषदेला झेलेन्स्की उपस्थित राहिले असताना रशियाने हा हल्ला केला. या परिषदेमध्ये अन्य मह्वाच्या मुद्द्यांबरोबर रशिया-युक्रेन युद्धाबाबत देखील चर्चा होणे अपेक्षित आहे.





