मुंबईत हादरवणारा प्रकार..! ११ वर्षांच्या मुलावर पिटबुलचा हल्ला, मालक हसत राहिला; व्हायरल व्हिडीओने खळबळ

मुंबई : मुंबईच्या मानखुर्द येथे एक धक्कादायक आणि अमानुष घटना घडली आहे. ११ वर्षांचा हमझा हा मुलगा बिल्डिंग क्रमांक ९१ए समोर उभ्या असलेल्या रिक्षात खेळत असताना, स्थानिक रहिवासी मोहम्मद सोहेल हसन खान (वय ४३, व्यवसाय, एसी दुरुस्ती तंत्रज्ञ) याने आपल्या पिटबुल कुत्र्याची लीश काढून त्याला जाणीवपूर्वक मोकळे सोडले.
या पिटबुलने हमझावर क्रूरपणे हल्ला करत त्याच्या हनुवटी, हात आणि पाठीवर चावे घेतले, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. विशेष म्हणजे, या हल्ल्यादरम्यान सोहेल खान रिक्षेच्या पुढच्या सीटवर बसून हमझाच्या रडण्याचा आणि भीतीचा आनंद घेत हसत होता, तर आजूबाजूचे काही लोक हसत आणि व्हिडीओ शूट करत होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकाराने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.
नेमकं काय घडलं?
ही भयंकर घटना मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीएमजीपी म्हाडा कॉलनीत १७ जुलै रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हमझा आपल्या मित्रांसोबत रिक्षात खेळत असताना, त्यांनी सोहेल खान याच्यासोबत त्याचा पिटबुल पाहिला आणि “पिटबुल!” असे ओरडले. यानंतर, सोहेल खान याने जाणीवपूर्वक आपला कुत्रा रिक्षात सोडला आणि स्वतः पुढच्या सीटवर बसला.
व्हायरल व्हिडीओमध्ये हमझा घाबरून “काका, नको!” अशी विनवणी करताना दिसत आहे, पण सोहेल खान याने कुत्र्याला रोखण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. उलट, तो हसत राहिला. काही सेकंदांनंतर, पिटबुलने हमझाच्या हनुवटीवर चावा घेतला, आणि तो रिक्षातून पळण्याचा प्रयत्न करत असताना कुत्र्याने त्याचे कपडे तोंडात पकडले आणि त्याचा पाठलाग केला.
हमझाने सांगितले, “मी माझ्या मित्रांसोबत रिक्षात बोलत होतो. माझ्या मित्राने पिटबुल पाहून ओरडले. तो माणूस कुत्र्यासह रिक्षात आला आणि त्याने कुत्र्याला माझ्यावर सोडला. मी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो हसत राहिला. कुत्र्याने मला चावले, आणि मी कसाबसा पळालो, पण त्याने माझे कपडे पकडले. आजूबाजूचे लोक व्हिडीओ काढत होते, कोणीच मदत केली नाही.” या हल्ल्यामुळे हमझाला हनुवटी, हात आणि पाठीवर जखमा झाल्या, आणि तो मानसिकदृष्ट्या प्रचंड घाबरला आहे.
दरम्यान, हमझाच्या वडिलांनी १८ जुलै ला मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर, पोलिसांनी सोहेल खान याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (BNS) कलम २९१ (प्राण्यांबाबत बेजबाबदार वर्तन), १२५ (जाणीवपूर्वक दुखापत करणे), आणि १२५(ए) (धोकादायक प्राण्याद्वारे हानी पोहोचवणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तसेच, BNS च्या कलम ३५(३) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली. मात्र, सोहेल खान याला अटक न करता केवळ नोटीस देऊन सोडण्यात आले, ज्यामुळे हमझाच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक रहिवाशांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे.





