Narendra Modi : नरेंद्र मोदी हे विष्णूचे 11 वे अवतार; ‘या’ बड्या नेत्याचे वक्तव्य

ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची नुकतीच राज्यसभेच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. याबद्दल आज दादर येथील वसंत स्मृती सभागृहात उज्वल निकम यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सिद्धिविनायक ट्रस्टचे कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी आणि भाजपचे नेते राज पुरोहित उपस्थित होते. या सत्कार समारंभात राज पुरोहित यांनी पंतप्रधान मोदींच्या संदर्भात एक मोठं वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले राज पुरोहित?
उज्वल निकम हे राज्यसभेचे खासदार झाले, त्यानिमित्तानं दादर येथील वसंत स्मृती सभागृहात त्यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे, या सत्कार समारंभामध्ये बोलताना भाजप नेते राज पुरोहित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना विष्णूशी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे 11 वे अवतार असल्याचे ते म्हणाले. नरेंद्र मोदी हे न थांबणारे न थकणारे पंतप्रधान आहेत, आपण अमेरिकेला जाऊन आलो की दोन दिवस जेट लॉक लागतो, मोदी फिनलंड, इंग्लंड दौरा करून अहमदाबादमध्ये दोन दिवसांत २२ उद्घाटनं करतात असे पुरोहित म्हणाले.
उज्वल निकम काय म्हणाले?
मी मराठीत भाषण करणार आहे, याचा अर्थ असा नाही की मला इतर भाषा आवडत नाहीत. मातृभाषा ही महत्त्वाची आहेच, पण इतर भाषा ही बुद्धीची कुवत वाढविण्यासाठी आवश्यक असतात. राज्यसभा सदस्य व राष्ट्रपती प्रतिनिधी म्हणून आपल्याकडून पहिला जाहीर सत्कार होत आहे. शपथ कशी घ्यायची? अध्यक्षांना नमस्कार करून कसे बसायचे? याची रंगीत तालीम तिथल्या अधिकाऱ्यांनी परवाच घेतली.
चार ओळींची शपथ मुखोद्गत झाली होती. शपथ मराठी भाषेत घेण्यास सुरुवात केली, त्याठिकाणी सोनियाजी बसल्या होत्या, त्यांना मराठी समजले नसेल म्हणून मी इंग्रजीत सांगितले की ही मराठी भाषा आहे. राजकारण करण्यासाठी काही लोक बेगडी प्रेम दाखवतात. मला राजकारणात यायचे नव्हते, पण देवेंद्र फडणवीस व अमित शाह यांचा आग्रह होता असे उज्वल निकम यावेळी म्हणाले.





