इंदापूरकर रस्त्यावर; शेतकऱ्याचा आत्मधदहनाचा प्रयत्न

रेडा/ वडापुरी – उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील 22 गावांना उचलण्याचा निर्णय जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रद्द केल्यानंतर इंदापूर तालुक्यातीलराष्ट्रवादी कॉंग्रेस व पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संतप्त पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी रस्त्यावर उतरले.
निमगाव केतकी येथे बैठकीत एका शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. हिंगणगाव येथे पुणे- सोलापूर महामार्गावर टायर जाळून रस्ता रोखला. यावेळी भरणे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली तर निर्णय रद्द केल्याबद्दल सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या निर्णयाचे इंदापूर तालुक्यात तीव्र पडसाद उमटले आहेत.
निमगाव केतकी येथे पाणी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी यावेळी काळया फिती बांधून शेतकऱ्यांनी निषेध केला. इंदापूर-बारामती रस्ता रोखून धरला. निर्णय रद्द केल्याच्या निषेधार्थ एका शेतकऱ्याने कृती समितीच्या बैठकीत अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखून तात्काळ हालचाल केल्यामुळे अनर्थ टळला. उजनीतून इंदापूरला पाच टीएमसी पाणी देण्याचे आदेश काढले होते.
मात्र, त्याची अंमलबजावणी होण्याआधीच सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी विरोध केला होता. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा निषेध केला. सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांच्या विरोधाची दखल घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आदेश रद्द केला आहे. याचे दिवसभर इंदापूर तालुक्यात संताप व्यक्त केला. यापुढे कायदेशीर मार्गाने पाण्यासाठी लढा उभारण्याचा निर्धार यावेळी पाणी संघर्ष कृत्ती समितीने केला आहे.





