इंदापूर : उजनी जलाशयातील पाणी प्रदूषणाच्या गंभीर समस्येचा सखोल अभ्यास करण्यासाठी दिल्लीतील विज्ञान आणि पर्यावरण केंद्राचे संशोधक विशेष बैठकीसाठी येत आहेत. रविवारी, 7 जुलै 2025 रोजी इंदापूर येथील जय नर्सिंग इन्स्टिट्यूट, दत्तनगर येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 16 मे रोजी आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी भिगवण येथे बैठक घेऊन उजनीच्या दूषित पाण्याची पाहणी केली होती. यावेळी जल बिरादरी महाराष्ट्र प्रांताध्यक्ष नरेंद्रभाई चुघ, तेलंगणाचे माजी मंत्री व्ही. प्रकाश राव, आंध्र प्रदेशचे सत्यनारायण बोलशेट्टी आणि हैदराबादचे आकाश पांडे उपस्थित होते. डॉ. सिंह यांनी पाणी प्रदूषणाची गंभीरता अधोरेखित करत, यावर तीव्र आवाज उठवण्याचे आश्वासन दिले होते. पुणे, पिंपरी-चिंचवड येथील मलमूत्र, औद्योगिक सांडपाणी, रासायनिक खते यांमुळे उजनीचे पाणी पिण्यास अयोग्य झाले आहे. यामुळे जलचरांचा मृत्यू होत असून, मानव व प्राण्यांनाही गंभीर आजारांचा धोका आहे. 7 जुलै रोजी दिल्लीतील संशोधक स्वाती भाटिया, तारा तन्मय, जान्हवी खत्री आणि नरेंद्र चुघ भिगवण, पळसदेव आणि इंदापूर येथे भेटी देणार आहेत. ते मच्छीमार, शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधून पाण्याच्या प्रदूषणाचा मानव, प्राणी आणि जलचरांवर होणारा परिणाम अभ्यासतील. यानंतर दिल्लीतील संशोधन केंद्रात वैज्ञानिक पद्धतीने पुढील संशोधन होईल. बैठकांचे वेळापत्रक दुपारी 12 वाजता भिगवण, 1 वाजता पळसदेव आणि 2 वाजता इंदापूर येथे संशोधक उपस्थित राहतील. नागरिकांनी या गंभीर समस्येवर आवाज उठवण्यासाठी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन भजनदास पवार, भारत मल्हार, मारुती वनवे, प्रकाश ढवळे, रमेश धावडे, सखाराम खोत, प्रा. कृष्णाजी ताटे, हमीद अत्तार, प्रा. महादेव चव्हाण, जयवंत नायकुडे, संदिपान कडवळे आणि भारत बोराटे यांनी केले आहे. या हालचालींमुळे उजनी जलाशयातील पाणी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. नागरिकांमध्ये प्रदूषणमुक्त पाण्याची आशा निर्माण झाली असून, उजनी पाणी प्रदूषण बचाव समितीने यावर तीव्र संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.