उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नियुक्त्यांचे बळ.. मरगळ आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचे प्रयत्न

पिंपरी – राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर आणि शिवसेनेतील बंडामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काहीसे नैराश्येचे वातावरण होते. वर्षभरापासून पक्षात रिक्त असलेली पदे भरण्याकडे वरिष्ठ पातळीवरून देखील दुर्लक्ष झाले होते. बंडखोरीचे हे आव्हान रोखण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू केले आहेत. पिंपरी-चिंचवड, मावळ जिल्हाप्रमुखपदी माजी आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांच्यासह इतर नियुक्त्यांच्या हालचालीकडे पक्षाने पाऊले टाकली आहेत. त्यामुळे मरगळलेल्या शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला. पक्षातील पदाधिकाऱ्यांनी पुन्हा मूळ शिवसेना पक्ष उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे पिंपरी-चिंचवड, मावळ जिल्हाप्रमुख पद एक वर्षांहून अधिक काळ रिक्त होते. त्या पदावर नियुक्ती करण्याकडे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे देखील दुर्लक्षच झाले होते. दरम्यानच्या काळात शिवसेनेत बंडखोरी झाली. राज्यात पक्षाची झालेली वाताहत रोखणे गरजेचे होते. अनेक पदाधिकारी, नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात डेरेदाखल होत होते. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा उत्साह मावळला होता. पक्ष टिकवायचा असेल तर कार्यकर्त्यांना वरिष्ठ पातळीवरून बळ देणे गरजेचे होते. खचलेले मनोर्धेर्य वाढविण्यासाठी राज्यातील पदाधिकाऱ्यांनी बैठका, मेळावे घेणे आवश्यक होते. तसेच रिक्त झालेल्या पदांवर तात्काळ नियुक्त्या देऊन पक्षसंघटन बळकटीकरणासाठी प्रवृत्त करायची गरज निर्माण झाली होती. वरिष्ठ नेत्यांनी मावळ लोकसभेत होणारी वाताहत पाहिली आणि त्याला आवर घालण्यासाठी जिल्हाप्रमुखपद निवडीचा बाण सोडला.
माजी आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांच्या निवडीने पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ मधून निष्ठावान शिवसैनिक त्यांच्या कार्यालयात शुभेच्छांसाठी मोठी गर्दी करत आहेत. पक्षाने दिलेल्या ताकदीचा उपयोग करून जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यांचा मेळ घालण्याचा निर्धार चाबुकस्वार यांनी व्यक्त केला आहे.
रिक्त पदांवर तरूण चेहऱ्यांना संधी दिल्यास पक्ष उभारणीत ते महत्त्वाचा वाटा उचलतील. पक्षाने ज्यांना मोठे केले त्यांनी पक्षाशी केलेला व्यवहार चुकीचा असल्याचे पटवून देण्यात चाबुकस्वार यशस्वी झाले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची ताकद पिंपरी-चिंचवडसह मावळमध्ये वाढेल हे मात्र नक्की. तसेच आगामी महापालिका निवडणुकीत जास्तीत-जास्त नगरसेवक निवडून आणण्याचे आव्हान देखील चाबुकस्वार यांच्यासमोर असणार आहे.
पिंपरी विधानसभेत मिळणार ताकद
पिंपरी विधानसभा एससी प्रवर्गासाठी आरक्षित आहे. या विधानसभेतून 2014 मध्ये ऍड. गौतम चाबुकस्वार विजयी झाले होते. 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला. या मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे. त्यामध्ये ऍड. चाबुकस्वार यांना जिल्हाप्रमूखपदी नियुक्ती दिल्याने या मतदारसंघात त्यांची ताकद वाढणार असून त्याचा विधानसभेला त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.





