“उद्धव ठाकरेंचा सत्ता गेल्यामुळे संयम सुटलाय, ते बावचळलेल्या परिस्थितीत बोलतात”- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई: राज्यातील दोन दसरा मेळाव्यावरून सर्वत्र उत्सुकता पाहायला मिळत आहे. दसरा मेळावे आणि त्यातील भाषणांमधून शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट या दोन्ही बाजूंनी जोरदार शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यताआहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंनी माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’ च्या अग्रलेखातील भूमिकेवरून उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. “उद्धव ठाकरेंच्या मनात जे आहे ते सामनातून प्रकाशित करतात. उद्धव ठाकरे बावचळलेल्या परिस्थितीत बोलतात. सत्ता गेल्यामुळे त्यांचा संयम सुटला आहे. सत्ता गेल्यानंतर संयम सुटायला नको”, असं बावनकुळे म्हणाले आहेत.
दरम्यान, अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीवरूनही बावनकुळेंनी टीका केली आहे. “अंधेरी विधानसभेची जागा भाजपा १०० टक्के जिंकेल. शिंदे गट आणि भाजपाच्या युतीच्या माध्यमातून आमचा या निवडणुकीत ऐतिहासिक विजय होईल. उद्धव ठाकरेंनी विचारही केला नसेल, एवढं मतदान होणार आहे. अडीच वर्षांचा राग अंधेरीच्या निवडणुकीत निघेल. त्यानंतर मात्र उद्धव ठाकरेंना मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवारही मिळणार नाही अशी अवस्था होईल”, असे त्यांनी यावेळी म्हटले.
“काँग्रेस-राष्ट्रवादीची गर्दी आणून उद्धव ठाकरेंचा मेळावा होणार आहे. शिंदेंकडे ४० आमदार, १२ खासदार आणि जनशक्तीचा मोठा गट आहे. तो मेळावा मोठा होईल. काहीजण टीका करत आहेत की सत्तेचा गैरवापर केला जात आहे. पण त्यांनी अडीच वर्षांत सत्तेचा किती गैरवापर केला. सत्तेची किती मस्ती केली. स्वत:चे कारखाने भरण्याकरता, स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी काय काय केलं?” असा सवालही बावनकुळेंनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, यावेळी बोलताना बावनकुळेंनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला ‘टोमणे सभा’ म्हणत खोचक टोला लगवला. “आत्ता उद्धव ठाकरे बावचळलेल्या स्थितीत आहेत. आजही टोमणेसभा होणार आहे. ते खूप टोमणे मारतील. ते अपेक्षितच आहे. त्यांना आता दुसरं काही काम नाहीये. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस विकासाचे स्पायडरमॅन आहेत. ते विकासाबद्दल बोलतील”, असे बावनकुळे म्हणाले.





