उद्धव ठाकरेंचं मशाल चिन्ह धोक्यात ? ‘या’ पक्षाने घेतला आक्षेप

मुंबई – शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरु आहे. न्यायालयातील लढाईसोबत उद्धव ठाकरे हे निवडणूक आयोगाची लढाई देखील लढत आहेत. पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटासाठी नाव आणि मशाल हे चिन्ह घोषित केलं. परंतु आता याही चिन्हामुळे ठाकरेंच्या अडचणी वाढणार आहेत. कारण एके काळी मशाल हे चिन्ह समता पक्षाचे प्रतीक होते.
मूळचा बिहारमधील असलेला समता पक्षा आता आपल्या चिन्हासाठी निवडणूक आयोगासह न्यायालयात धाव घेणार असल्याचे समजते. 1994 समता पार्टी या पक्षाची स्थापना दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांनी केली होती. 1996 साली समता पार्टीला मशाल चिन्ह देण्यात आलं.मात्र 2004 मध्ये या पार्टीची मान्यता निवडणूक आयोगाकडून रद्द करण्यात आली. तरीही समता पार्टी सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगाचे दार ठोठावणार असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने प्रसारित केले आहे. अशात मशालीमुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणी पुन्हा वाढणार असल्याचे दिसते.

उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्याच्या मैदानासाठी संघर्ष करावा लागला होता. आता चिन्हाची लढाई काही केल्या संपताना दिसत नाही. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळालं असून ढाल आणि तलवार हे चिन्ह देखील देण्यात आलं आहे. अशात आता अंधेरीत होणारी पोट निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे.




