Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; ‘या’ 2 नेत्यांसाठी थेट पुकारलं युद्ध!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली आज नागपूरमध्ये 'रामरक्षा पठण' आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून ठाकरे गटाने विरोधकांवर जोरदार राजकीय निशाना साधला.

Uddhav Thackeray : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली आज नागपूरमध्ये ‘रामरक्षा पठण’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून ठाकरे गटाने विरोधकांवर जोरदार राजकीय निशाना साधला.
या प्रसंगी पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय राऊत, चंद्रकांत खैरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
या आंदोलनादरम्यान बोलताना उद्धव ठाकरे यांनी एक मोठी घोषणा केली असून, दिल्लीत उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, या दोन्ही नेत्यांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी राहणार आहे. अनेकांनी त्यांना दिल्लीत जाण्याबाबत विचारणा केली असता, त्यांनी आपण दिल्लीला नक्की जाणार असल्याचे सांगितले. मात्र, दिल्लीला थेट न जाता आधी मुंबईत रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आणि त्यानंतरच दिल्लीची वाट धरणार असे त्यांनी स्पष्ट केले.
सुमारे वीस दिवसांपूर्वीच सोनम वांगचुक यांनी घरी येऊन भेट घेतली होती, तसेच अभिजीत दिपके यांच्याशीही फोनवरून सविस्तर चर्चा झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. हा लढा जसा मंदिराचा लढा आहे, तसाच उद्याचा लढा देशाचे भवितव्य असलेल्या तरुणांसाठी आणि दडपशाहीच्या विरोधातील लढा आहे, असे सांगत ज्यांना ही दडपशाही अमान्य आहे त्यांनी उद्या मुंबईतील आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आमंत्रण त्यांनी दिले.
बाळासाहेबांचे विचार सोडल्याच्या आरोपांना चोख उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, आम्ही आज ‘मंदिर चोरांना’ जाब विचारायला मैदानात उतरलो आहोत. ज्या विरोधकांमध्ये हिंमत असेल त्यांनी भाजपला थेट सवाल करावा, त्यांच्या घरचे केवळ पाणके बनून राहू नये. जर तथाकथित गद्दारांच्या अंगात खरोखरच हिंदुत्वाचे रक्त असेल, तर त्यांनी या मंदिर चोरांविरोधात आपली भूमिका स्पष्ट करून दाखवावी.
आंदोलनात जमलेल्यांच्या डोक्यावर केवळ भगव्या टोप्या नाहीत, तर आम्ही हातात घेतलेला भगवा झेंडा किंवा परिधान केलेला भगवा झब्बा ही काही गंमत नाही आणि आमची संघटना म्हणजे कोणती नाटक कंपनी नाही, असा टोला त्यांनी (Uddhav Thackeray) लगावला.
महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या काळातील आठवणींना उजाळा देत त्यांनी भाजपवर गद्दारीचा आरोप केला. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले तेव्हा आमच्यावर हिंदुत्व सोडल्याची चिखलफेक केली गेली, मात्र आता आम्ही भाजपला उलट विचारतो की तुम्ही का हिंदुत्व सोडले आहे, असा रोकडा सवाल त्यांनी केला.
सध्या सुरू असलेल्या विविध चौकशांवर भाष्य करताना ते म्हणाले की, एसआयटी सारख्या चौकशा म्हणजे निव्वळ थोतांड आहेत. सरकार केवळ एका महत्त्वाच्या विषयावरून जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी दुसरा निरर्थक विषय पुढे आणते आणि त्याचे भांडवल केले जाते.
भाषणच्या शेवटी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हा लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला. ते म्हणाले की, आम्ही मंदिराचा प्रश्न कधीही सोडणार नाही आणि या न्यायासाठी केवळ नागपुरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलने केली जातील. या लढ्याचा एक भाग म्हणून आम्ही लवकरच अयोध्या आणि काशी विश्वनाथ येथे जाऊन महाआरती करणार आहोत.
सरकारने चौकशीची नाटके आणि थेरं बंद करावीत, अशी मागणी त्यांनी केली. जर सरकारला खरोखरच प्रामाणिकपणे या प्रकरणाचा निकाल लावायचा असेल, तर त्यांनी निवृत्त न्यायाधीशांच्या अधिपत्याखाली एक समिती स्थापन करावी आणि त्यात अभय ओक यांच्यासारखे निवृत्त न्यायाधीश नेमावेत, जेणेकरून या प्रकरणातील ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होईल, असे आव्हान त्यांनी सरकारला दिले.






