CM शिंदेंच्या ठाण्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार ! उद्या शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार

Uddhav Thackeray | Eknath Shinde – छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यानंतर शिवसेनेच्या (उबाठा) वतीने उद्या (शनिवारी) गडकरी रंगायतन येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.
ठाणे लोकसभेत शिवसेना (उबाठा) गटाचे राजन विचारे यांचा पराभव झाला होता. त्यांना शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी पराभूत केले होते. त्या पराभवानंतर उद्या प्रथमच उद्धव ठाकरे यांचा पहिला ठाणे दौरा आहे.
उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली भेटीवरून देखील महायुतीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे मेळाव्यातून कुणावर निशाणा साधणार हे पाहावे लागणार आहे. ठाकरे यांच्याबरोबरीने युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते-खासदार संजय राऊत हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत.
सध्या शिवसेनेच्या (उबाठा) वतीने भगवा सप्ताह सुरु आहे. यात सप्ताहाच्या अंतर्गत उद्धव ठाकरे यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर व पुणे येथे मेळावा घेतला होता. या सप्ताहतील तिसरा मेळावा ठाण्यात घेण्यात येणार आहे.
यासाठी ठाणे शहरासह जिल्ह्यात शिवसैनिक झंझावाती सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी नेते व माजी खासदार राजन विचारे आणि ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे या मेळाव्यातून उद्धव ठाकरे कुणावर टीकास्त्र सोडतात हे पाहावे लागणार आहे.





