Uddhav Thackeray : कोकणात उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागली असून अनेक नेते पक्षाला सोडचिट्ठी देत आहेत. अलीकडेच कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेचा निष्ठावंत चेहरा म्हणून ओळख असलेले राजन साळवी यांनीही ठाकरेंना रामराम करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. असं असताना आमदार भास्कर जाधव हे देखील पक्षात नाराज असल्याचे वृत्त समोर आलं आहे. अशातच आता दापोली नगरपालिकेतील शिवसेना ठाकरे गटाच्या पाच नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून आपण वेगळा गट स्थापन करत असल्याचे म्हटले आहे. अजूनही काही माजी आमदार धनुष्यबाण हाती घेतील, असे वारंवार शिंदे गटातील नेतेमंडळी सांगत आहेत. त्यामुळे डॅमेज कंट्रोलसाठी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे लवकरच कोकणचा दौरा करणार आहेत. नवीन लोकांना सोबत घेऊन काम करू : उद्धव ठाकरे कोकणात नवीन लोकांना सोबत घेऊन आपण काम करू. जुन्या शिवसैनिकांना पुन्हा सोबत घेऊन आपल्याला विश्वास निर्माण करून संघटना उभी करायची आहे. उद्धव ठाकरे सगळ्यांशी संपर्क साधत आहेत. काही लोक सत्ता आमच्याकडे नसल्याने जात असतील. पण सत्तेच्या सोबत आहेत, त्यातीलही काही लोक आमच्यासोबत येतील. त्यानूसार आम्ही संघटना पुन्हा एकदा उभी करू, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. खासदारांची 20 तारखेला तर आमदारांची 25 तारखेला बैठक दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा खंदे समर्थक राजन साळवी यांनी पक्षाला सोड चिठी देत शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले. त्यानंतर अनेक नेते, पदाधिकारी यांनी देखील पक्षाला रामराम केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर आले आहेत. आता ते पक्षाच्या आमदार आणि खासदारांशी स्वतंत्र चर्चा करणार असून 20 तारखेला खासदारांची तर 25 तारखेला आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबईत मातोश्रीवर होणाऱ्या या बैठकीत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीच्या माध्यमातून ठाकरे डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. आत्तापर्यंत या नेत्यांनी सोडली उद्धव ठाकरेंची साथ पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या पाच नगरसेवकांनी जानेवारीमध्ये भाजपात प्रवेश केला. यामध्ये विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल, संगीता ठोसर, पल्लवी जावळे आणि प्राची आल्हाट या ५ नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. पक्ष सोडताना या माजी नगरसेवकांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांवर निशाणा साधला आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे मोठे नेते राजन साळवी यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर विलेपार्लेचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळे यांनी देखील पक्षाचा राजीनामा दिला आहे. जनावळे यांनी राजीनाम्यापूर्वी साहेब मला माफ करा असं उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक भावनिक पत्र लिहीलं आहे. तसेच दापोलीतील 5 नगरसेवकांनी देखील ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. विलास शिगवण, अन्वर रखांगे, मेहबूब तळघरकर, संतोष कलकुटके आणि अश्विनी लांजेकर यांनी आपला वेगळा गट स्थापन केला आहे. दर मंगळवारी बैठका होणार संघटना बांधणी आणि पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी आता दर मंगळवारी बैठक होणार आहे. उपरोक्त बैठकीत संघटनेतील कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात येईल. तसेच शिवसेनेचे प्रमुख नेते संघटनेसंबंधी विषयांवर जातीने लक्षन घालून अडचणींवर मार्ग शोधतील अशी माहिती समोर आली आहे. कुठल्याही पक्षात जाणार नाही : वैभव नाईक निवडणुकीतील पराभवानंतर पहिल्यांदाच वैभव नाईक यांनी काल उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांसोबतही संवाद साधला. ते म्हणाले, एसीबी चौकशीची लढाई एकटा लढणार, या लढाईसाठी कुठल्याही पक्षात जाणार नाही. तसेच माझ्यावर कुठलाही दबाव नाही. मी उद्धव ठाकरेंसोबत राहणार, ही माझी भूमिका स्पष्ट आहे, असंही वैभव नाईक यांनी सांगितले. पुढे म्हणाले, एसीबीची चौकशी माझी दोन अडीच वर्षापासून सुरू आहे. एसीबीची चौकशी ही लढाई माझी एकट्याची आहे आणि मी एकटा लढणार आहे. त्या लढाईसाठी मी कुठलाही पक्ष सोडणार नाही. भास्कर जाधवसारखा लढवय्या नेता कोकणात आहे आणि ते निश्चित नाराज नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. भास्कर जाधव कुठल्याही प्रकारे नाराज नाही ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत काम करत राहतील. असंही वैभव नाईक म्हणाले.