बाप्पा पावला! उद्धव ठाकरे प्रथमच जाणार शिवतीर्थवर; राज ठाकरेंनी दिलं आमंत्रण
Uddhav Thackeray | Raj Thackeray – मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेल्या ठाकरे बंधुंची सलगी दिवसेंदिवस वाढत आहे. आधी मराठीसाठी हिंदी सक्तीविरोधात एकत्र आलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत एकत्र आले होते.
त्यानंतर आता गणपती उत्सवाच्या निमित्ताने दोन्ही बंधू यांचे एक पाऊल आणखी पुढे सरकले आहेत. आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना गणपतीसाठी आमंत्रण केले आहे. त्यामुळे बाप्पाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे प्रथमच शिवतीर्थवर जाणार आहेत.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे वारंवार एकत्र येत असल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारण बरीच उलथापालथ सुरू झाली आहे. यापूर्वी राज ठाकरेंसाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना गळ टाकून बसले होते. मात्र, राज ठाकरे यांनी मराठी मुद्द्याला हात घातला आणि दोन्ही बंधू एकत्र आले.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे ‘मातोश्री’वर आले होते. ते तब्बल 20 वर्षांनंतर मातोश्रीची पायरी चढले होते. आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांना घरच्या गणपती दर्शनासाठी आमंत्रित केले आहे.
राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो. त्यामुळे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थवर येण्याचे आमंत्रण केले आहे. या आधी राज ठाकरे कृष्णकुंजवर राहायचे. त्या घरी उद्धव ठाकरे गेले होते.
मात्र, राज ठाकरे शिवतीर्थवर गेल्यानंतर आणि राजकीय दुराव्यामुळे उद्धव ठाकरे नव्या घरी गेले नव्हते. गणपतीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि कुटुंब प्रथमच शिवतीर्थवर जाणार आहेत.





