Uddhav Thackeray : ‘भाजपाच्या भाषिक दडपशाहीला उद्धव ठाकरेंनी दिला इशारा’; म्हणाले…

महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावरून वाद पेटला आहे. राज्य सरकारच्या तिसऱ्या भाषेच्या नावाखाली हिंदी सक्तीच्या निर्णयाला राजकीय नेते आणि अनेकांनी विरोध दर्शवला आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी भाजपावर भाषिक आणीबाणी लादण्याचा आरोप केला आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“आमचा हिंदी भाषेला विरोध नाही, पण सक्तीला आहे. हिंदी चित्रपटसृष्टी मुंबईतच जन्मली. अमिताभ बच्चन, हिंदी कलाकार, गायक इथे येऊन मोठे झाले. पण भाजपाची वाटचाल एकाधिकारशाहीकडे आहे. त्यांनीच आणीबाणीचा मुद्दा उपस्थित केला होता, पण आता ते भाषिक आणीबाणी लादत आहेत. ही सक्ती आम्ही स्वीकारणार नाही,” असे ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले तर हा वाद पाच मिनिटांत संपेल. हिंदी येत नसल्याने कुणाचे काही अडले नाही. भाजपाचा छुपा एकाधिकारशाहीचा अजेंडा मराठी भाषिकांना दाबण्याचा आहे. मी सर्व मराठी बांधवांना, कलाकार, साहित्यिक, खेळाडू, वकील यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करतो. भाजपाच्या मराठीप्रेमींनाही यात सहभागी व्हावे.”
मराठी भाषा भवन आणि रंगभूमी दालनाचा मुद्दा
उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील निर्णयांचा उल्लेख करत सरकारवर टीका केली. “मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषेची सक्ती केली होती. मराठी रंगभूमी दालनाचा आराखडा मंजूर झाला होता, पण या सरकारने तो रद्द करून ती जमीन बिल्डर्सच्या घशात घातली. मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन झाले होते, पण तिथे एकही वीट रचली गेली नाही. तेव्हा अजित पवार माझ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते. त्यांना हे मान्य आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हिंदी सक्तीविरोधात आंदोलनाला पाठिंबा
उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “कोणत्याही भाषेचा द्वेष नाही, पण कारण नसताना हिंदी सक्ती लादली जात आहे. महाराष्ट्रावर हुकुमशाही लादण्यासाठी शिवसेना संपवायची आहे, पण शिवसेना मराठी माणसावरील अन्यायाविरोधात लढण्यासाठी जन्मली आहे. आम्ही दीपक पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत. हा आंदोलनाचा प्रारंभ आहे. जोपर्यंत सक्ती मागे घेतली जाणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील.”
दीपक पवार यांच्यासोबत चर्चा
हिंदी सक्तीविरोधात मराठी भाषा समन्वय समितीचे प्रतिनिधी दीपक पवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली. पवार यांच्या हिंदी सक्तीविरोधी आंदोलनाला ठाकरे यांनी पूर्ण पाठिंबा जाहीर केला. हे आंदोलन हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून आझाद मैदानावर सुरू होणार आहे. ठाकरे यांनी सर्व मराठी बांधवांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
भाजपावर टीकास्त्र
“भाजपा मराठी भाषिकांमध्ये विषाचा खडा टाकत आहे. सगळं चांगलं चाललं असताना ते वाद निर्माण करत आहेत. हिंदी भाषेला आमचा विरोध नाही, पण सक्तीला आहे. भाजपाची एकाधिकारशाही आणि छुपा अजेंडा स्पष्ट दिसत आहे,” असे ठाकरे म्हणाले. या वादाने महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असून, हिंदी सक्तीविरोधात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.





