Uddhav Thackeray | Delhi Tour – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि यूबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे उद्या पासून (६ जुलै) तीन दिवसांसाठी दिल्लीला जाणार आहेत. त्यांच्या तीन दिवसांच्या भेटीदरम्यान, ते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि इंडिया आघाडीच्या इतर नेत्यांना भेटण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी आज सांगितले की, ‘उद्धव ठाकरे यांच्यासोबत अदित्य ठाकरे हेही दिल्लीला जात आहेत. ते दिल्लीत काही नेत्यांची भेट घेतील, आणि त्यांच्याशी राजकीय विषयांवर चर्चा होईल, खर्गे आणि सोनिया यांच्या बरोबरच ते राहुल गांधी यांनाही भेटणार आहेत. उद्धव ठाकरे दिल्लीत टीएमसी, आप आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांचीही भेट घेणार आहेत. महाराष्ट्रातील इतर पक्षाच्या काही खासदारांनीही त्यांच्या दिल्ली दौऱ्यात त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे, त्यामुळे आम्ही त्याचेही आयोजन करणार आहोत असे राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे (एससीपी) अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेल्या भेटीवर प्रतिक्रिया विचारली असता संजय राऊत म्हणाले की, दोन्ही नेत्यांमधील भेटीबाबत मी भाष्य करू शकत नाही. पवार साहेबांची मुख्यमंत्र्यांशी धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या संबंधात भेट झाली असे मी म्हणू शकत नाही, परंतु धारावीबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. ही ६०० एकर जमीन आहे. तेथे ८ लाख लोक राहतात आणि त्या सर्वांचे याच ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे असेही राऊत यांनी स्पष्ट केले.