Uddhav Thackeray : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, मतमोजणी १६ जानेवारी रोजी होईल. येत्या काही दिवसांतच मतदान असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या. या दोन्ही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुक नेते आणि कार्यकर्त्यांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश केले. काही ठिकाणी उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही पक्ष सोडले, ज्यामुळे ऐनवेळी दुसरा उमेदवार शोधण्यात सर्वच पक्षांची चांगलीच दमछाक झाली. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत भाजपात मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाल्याचे दिसले. याचा फटका इतर पक्षांना बसला, विशेषतः शिवसेना शिंदे गटाला सर्वाधिक धक्का बसला. त्यावेळी शिंदे गटाने नाराजीही व्यक्त केली होती. मात्र, महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपाने शिवसेना शिंदे गटासोबत युती केल्याने हे चित्र बदलले. परंतु आता शिवसेना ठाकरे गटाने शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख दादा पवार यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे. ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. पक्षप्रवेशानंतर दादा पवार यांचे अश्रू अनावर झाले. त्यांनी भावूक होऊन सांगितले, “मला घरी आल्यासारखं वाटतंय. आम्हाला जी आश्वासने शिंदे गटात जाताना देण्यात आली होती, त्यापैकी एकही पूर्ण झाले नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा स्वगृही आलो आहोत. आता मरेपर्यंत शिवसेना ठाकरे गट सोडणार नाही.” हा प्रवेश ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटासाठी मोठा झटका ठरला आहे. राज्यातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतरांचा हा सिलसिला सुरू असून, मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. ठाकरे गटाकडून या प्रवेशाचे स्वागत करताना पक्षाच्या स्थानिक पातळीवरील ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात अशा घडामोडींमुळे राजकीय समीकरणे अधिक रोमांचक झाली आहेत. १५ जानेवारीला मतदानानंतरच हे धक्के किती प्रभाव टाकतात, हे स्पष्ट होईल.