पुणे – महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 26 मधील उमेदवार विजय ढेरे यांनी मतदारांना एकजुटीने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. “भाजपाला रोखायचे असेल तर मतविभाजन टाळणे गरजेचे असून, तिसऱ्या कोणत्याही पर्यायाचा विचार न करता राष्ट्रवादी काँग्रेसला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे,” असे त्यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक २६ मधील गुरुवार पेठ, घोरपडे पेठ व समता भूमी परिसरात होणाऱ्या प्रचार दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ढेरे यांनी हे आवाहन केले. या भागातील नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांनी महानगरपालिकेतील प्रश्नांवर भूमिका मांडली. ढेरे म्हणाले की, भाजपच्या कारभारामुळे सामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे. पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि नागरी सोयीसुविधा या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस ठोस व प्रभावी काम करेल. “मतदारांनी भावनिक न होता विचारपूर्वक मतदान करावे. जिंकू शकणाऱ्या पर्यायाला ताकत द्यावी. तिसऱ्या पर्यायाला मतदान करून आपले मत वाया घालवू नये. आपल्या मतांचे विभाजन झाले तर त्याचा फायदा भाजपाला होईल. त्यामुळे त्यांना खरोखर रोखायचे असेल तर या निवडणुकीत फक्त घड्याळ लक्षात ठेवा” असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी उमेदवार सीमा मिलिंद काची, गणेश कल्याणकर, रुपाली पाटील ठोंबरे, मा.नगरसेवक मिलिंद काची यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.