अहिल्यानगरमध्ये उद्धव ठाकरेंना धक्का; अनेक पदाधिकाऱ्यांसह उपसरपंचांचा शिवसेनेत प्रवेश

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागली आहे. जिल्ह्यातील संगमनेर खुर्द गटातील ठाकरे गटातील उपतालुकाप्रमुख निलेश गुंजाळ, गणप्रमुख सकत खुळे, झोळेचे उपसरपंच मेजर गोविंद खर्डे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला.
यावेळी व्यासपीठावर तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे, रमेश काळे, शहरप्रमुख दिनेश फटांगरे गणप्रमुख श्याम राहणे, उपशहरप्रमुख अजित जाधव यांच्यासह संगमनेर खुर्द, रायतेवाडी, निमगाव पागा येथील शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना अमोल खताळ म्हणाले की, मी जरी आमदार असलो तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक कार्यकर्ता म्हणूनच काम करत आहे. शिवसेनेत सर्वजण स्वतःला कार्यकर्ता समजून काम करतात. शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या सर्व शिवसैनिकांचा मानसन्मान केला जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
खताळ म्हणाले, संगमनेरमध्ये सर्वसामान्यासाठी लवकरच आपले संपर्क कार्यालय सुरू होत आहे. त्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी स्वतः उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे येणार आहेत. तेव्हा असंख्य तरुण शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीमध्ये भगवा फडकवायचा आहे. त्या दृष्टीने सर्वांनी कामाला लागावे, असाही सल्ला आमदार अमोल खताळ यांनी दिला.
गेली अनेक वर्षापासून माझ्या झोळे गावचा विकास झाला असता तर कायापालट झाला असता. परंतु गेली चाळीस वर्षात गावाचा विकास झाला नाही. त्यामुळे माझ्या गावाचा विकास करण्यासाठी तसेच हिंदुत्वाची भावना जागृत करण्यासाठी आणि गावातील लोकांच्या मनातील दहशत घालविण्यात मी यशस्वी झालो. गावाच्या विकासासाठी आपण आ. अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
गोविंद खर्डे, उपसरपंच, झोळे ग्रामपंचायत.





