‘औरंगजेब तुमचा कोण लागतो?’, उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल, केंद्र सरकारवरही साधला निशाणा

मुंबई – नागपूर दंगलीवरून उद्धव ठाकरे यांनी आज महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला. थडगे काढण्यासाठी आंदोलने करण्यापेक्षा केंद्र सरकारकडे जाऊन औरंगजेबाचे थडगे काढण्याची मागणी करा, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला. औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकार संरक्षण देतेय, तर मग औरंगजेब तुमचा कोण लागतो. नागपूरची घटना पूर्वनियोजित असेल, तर तुमचे गृह खाते झोपा काढत होते का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाची कबर उघडण्यामध्ये असमर्थता दाखवली आहे. त्या कबरीला केंद्राचे सरंक्षण आहे. केंद्र सरकार औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण देणार असेल, तर मग केंद्र सरकार किंवा भाजपला आम्ही विचारतोय की, तो औरंगजेब तुमचा कोण लागतो. औरंगजेब असो, अफजल खान असो, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे आहेत. ते नष्ट करायचे असेल, आंदोलन काय करताय? तुम्ही केंद्र सरकारकडे जा, मोदींकडे जा आणि त्यांना म्हणा की, गुजरातमध्ये जन्माला आलेला औरंगजेब ज्याला महाराष्ट्राने मुठमाती दिली. त्याची कबर तुम्ही उद्ध्वस्त करा. कबर उखडण्याचा जेव्हा सोहळा कराल, तेव्हा चंद्राबाबू आणि नीतेश कुमारांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा. औरंगजेबाची कबर हटवणे सोपा विषय आहे. त्यात दंगल करायचे कारण काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
…तर गृह खाते झोपा काढत होते का?
गृहमंत्र्यांचे घर आणि आरएसएसचे मुख्य कार्यालय हे नागपूर आहे. अशा नागपूरमध्ये हिंदू खतरे में कसा काय? मग इतके वर्ष तुम्ही नेमके केले काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. नागपूरची घटना पूर्वनियोजित असेल, तर तुमचे गृह खाते झोपा काढत होते का? हा पूर्वनियोजित कट तुमच्या कानावर आला कसा नाही? जर आला असेल, तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केले का? अशी प्रश्नांची सरबत्ती उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केली.
इतरही प्रश्न महत्वाचे
हे अपयशी सरकार आहे. फसवेगिरी करून सत्तेत आले आहे. यांच्या सगळ्या योजना, ज्या थापा यांनी निवडणुकीत मारल्या होत्या, लाडकी बहीण, शेतकरी कर्जमुक्ती अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही औरंगजेबाचे थडगे जरुर उकरा, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या चिता जळत आहेत, त्याकडे लक्ष देणार आहेत की नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. एकदाच ते थडगे उकरून विषय संपवून टाका, अशा शब्दांत ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.





