गद्दारांना ‘छावा’ दाखवलाच पाहिजे; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

मुंबई : औरंगजेब हा क्रूर शासक नव्हता. तो उत्तम प्रशासक होता. औरंगजेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यात धर्माची लढाई नव्हती असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले होते. या वक्तव्यामुळे अबू आझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, निलंबन किती दिवसासाठी केलंय हे महत्त्वाचे आहे. कारण, हे निलंबन 5 वर्षांसाठी करायला पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. तसेच आज सर्व आमदारांना ‘छावा’ सिनेमा दाखवण्यात येणार असल्याचे स्वागत करत गद्दारांना छावा सिनेमा दाखवायलाच हवा, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे म्हणाले की, निलंबन कायमचं, 5 वर्षांसाठी केलं पाहिजे, ही सरकारची जबाबदारी आहे. तसेच छावा चित्रपट दाखवण्याची संकल्पना मांडली, त्यांचे मी अभिनंदन करतो. संभाजी महाराजांवरील छावा चित्रपट दाखवत आहेत, ते चांगलेच आहे. मात्र, शिवाजी महाराजांवरील चित्रपट देखील दाखवला पाहिजे. सूरतेला पळून गेलेल्यांना दाखवले पाहिजे की, आपल्या महाराजांनी सूरत कशी लुटली होती, त्यांचे शौर्य समजले पाहिजे. मेलो तरी बेहत्तर पण त्यांनी धर्म बदलला नाही, त्यामुळे आपल्या संभाजीराजांचा पिच्चर गद्दारांना दाखवलाच पाहिजे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.
पुढे बोलताना म्हणाले, अविश्वास प्रस्ताव आणायला आमच्याकडून उशीर झाला, पण आत्तापर्यंत त्या निलंबितच व्हायला पाहिजे होत्या, असे म्हणत निलम गोऱ्हे यांच्या देखील निलंबनाची मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली आहे. तसेच, याच अधिवेशना निलम गोऱ्हे यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावर आम्हाला चर्चा अपेक्षित आहे. आम्ही ज्या कारणासाठी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे, ती करणे तुमच्यासमोर येतील. याशिवाय पक्षांतर हा देखील विषय आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल, महाराष्ट्रातील दैवतांबद्दल कोणी अपशब्द काढेल त्याला चांगली अद्दल घडेल अशी शिक्षा झाली पाहिजे. पुन्हा असं बोलण्याची कुणाची हिंमत होता कामा नये. अबू आझमी यांचे कायमचे निलंबन केले पाहिजे, असे माझे मत आहे’ असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.




