उद्धव ठाकरेंना ‘या’ मतदारसंघातून उमेदवारी द्या; सामाजिक कार्यकर्त्याने पत्राद्वारे केली माविआकडे मागणी

अकोला : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी विधानसभेच्या आखाड्यात उतरावं असं आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं होतं. या आव्हानानंतर उद्धव ठाकरेंना थेट अकोला पश्चिम मतदारसंघातून उभा करण्याची मागणी महाविकास आघाडीकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि शिंदे गटाचे माजी नेते जावेद जकारिया यांनी महाविकास आघाडीकडे ही मागणी केली.
काय म्हणाले जावेद जकारिया?
उद्धव ठाकरे अकोला पश्चिम मतदारसंघातून उभे राहिले तर अकोल्यातील मतदार त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. दंगलीचा इतिहास असलेल्या अकोला शहरात उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीने जातीय सलोखा निर्माण होणार असल्याचंही जावेद जकारिया यांनी म्हटलंय. जकारीया यांच्या या मागणीला आता महाविकास आघाडी कसा प्रतिसाद देते? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
कोण आहेत जावेद जकारिया?
जावेद जकारिया अकोल्यातील जकारिया फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. मुस्लिमातील कच्छी मेनन समाजाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. अकोल्यातील सामाजिक क्षेत्रात मोठी ओळख असल्याचेही बोलले जाते. कोरोना काळात 2200 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले होते, त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुकही झाले होते. वर्षभरापूर्वी त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, भाजप आणि शिंदे सेनेतील काही नेत्यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्यांमुळे पक्षाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अल्पसंख्यांक आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणूनदेखील त्यांनी काम केले आहे.



