महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरणात (Uddhav Thackeray) मोठी उलथापालथ झाली आहे. महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून, त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे, महायुतीने विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दणदणित विजय मिळवला आहे. या निकालांनुसार, भारतीय जनता पार्टी (भाजप) राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर शिवसेना (शिंदे गट) दुसऱ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तिसऱ्या क्रमांकावर आहे. याउलट, शिवसेना (ठाकरे गट) ला या निवडणुकीत सर्वाधिक फटका बसला असून, पक्षातील अंतर्गत असंतोष वाढत चालला आहे. निवडणुकीचे निकाल हाती येताच शिवसेना (ठाकरे गट) ला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे महानगर प्रमुख राजू वैद्य यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे. काही दिवसांतच महापालिका निवडणुका होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा धक्का ठाकरे गटासाठी अत्यंत गंभीर मानला जात आहे. राजू वैद्य हे छत्रपती संभाजीनगरमधील प्रमुख नेते असून, त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाची ताकद आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते, मात्र हे यश विधानसभा निवडणुकीत टिकवता आले नाही. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकारी महायुतीत सामील झाले. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) मध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले असून, ही प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. आता पक्षाला लागलेली ही गळती थांबवण्याचे मोठे आव्हान शिवसेना (ठाकरे गट) समोर उभे ठाकले आहे. पक्षातील नेत्यांची सततची गळती ही ठाकरे गटासाठी डोकेदुखीचा विषय बनली असून, राजू वैद्य यांच्या राजीनाम्याने त्यात आणखी भर पडली आहे. दरम्यान, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना (ठाकरे गट) महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) सोबत युती करण्याच्या तयारीत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांमधील बोलणी अंतिम टप्प्यात असून, लवकरच या युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) देखील या युतीत सहभागी होण्याची चर्चा आहे. ही युती झाल्यास महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात मुंबई महापालिकेत कडवी टक्कर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या निकालांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण केले असून, महायुतीची ताकद वाढली आहे, तर महाविकास आघाडीला आपली रणनीती पुन्हा आखण्याची गरज निर्माण झाली आहे. आगामी महापालिका निवडणुका या पार्श्वभूमीवर आणखी रोचक होणार आहेत.