नागपूर : काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अल्पसंख्यांकांच्या व्होटबँकेवरून केलेल्या कोण होतास तू, काय झालास तू.. या टिकेच्या ठाकरेंनी फडणवीसांना भ्रष्टाचाऱ्यांवर पांघरूण घातलेस तू .. म्हणत प्रतिप्रतिउत्तर दिले. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विधिमंडळात जाऊन शिवसेना आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर, घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नागपूरच्या अधिवेशनातून विदर्भाला काय मिळालं? असा सवालही त्यांनी पत्रकार परिषदेतून उठवला. शहांच्या हिंदुत्ववादी भूमिकेवरुन देखील उद्धव ठाकरे यांनी टीका केली. गृहमंत्री शहांनी मला हिंदुत्व शिकवू नये, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू गोमांस खातात, मग त्यांचा राजीनामा घेणार का ? जय शाह पाकिस्तानसोबत भारताचे सामने खेळवतो, हेच तुमचे हिंदुत्व आहे का? असे म्हणत ठाकरेंनी शहांवर टिकास्त्र सोडले. न्यायाधीशांवरील महाभियोगासंदर्भातही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना, त्या न्यायाधीशांची आतापर्यंतची कारकीर्द वादग्रस्त आल्याने त्यांच्यावरील महाभियोगाला समर्थन दिल्याचे सांगितले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधीपक्ष नेतेपदावरुन देखील राज्य सरकारला सुनावले. विरोधी पक्षनेता म्हणून भास्कर जाधव यांचे नाव पुढे देण्यात आले होते. मात्र, त्याबाबत विधिमंडळाच्या चौथ्या दिवसापर्यंत निर्णय झालेला नाही. विरोधी पक्षनेत्याला सरकार घाबरत आहे का? असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी लगावला. विमा कंपन्यांवर कारवाई करणार का ? आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना न मिळालेल्या मदतीवरून आणि विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीला होत असलेल्या विलंबावरूनही ठाकरेंनी सरकारवर टीका केली. शेतकऱ्यासाठीच्या मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारने घाईघाईने पाठवला आहे. त्या प्रस्तावात काय आहे ते माहित नाही. पीक विम्यावरून शेतकऱ्याची थट्टा करण्यात आली आहे. विमा कंपन्यांवर कारवाई होणार का? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.