uddhav thackeray | devendra fadnavis – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व भाजपतील राजकीय कटुता सध्या एका नव्या उंचीवर पोहोचली आहे. असे असताना उद्धव ठाकरे व भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मातोश्री येथे गुप्त भेट झाल्याचा दावा करत, वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते तथा उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी एकच राजकीय खळबळ उडवून दिली आहे. वंचितच्या या दाव्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. मोकळे म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीला शिवसेना ठाकरे व भाजपमधील राजकीय घटनाक्रमाविषयी एक विश्वासार्ह बातमी मिळाली आहे. त्यानुसार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 25 जुलै रोजी मध्यरात्री 2 च्या सुमारास 7 डी मोतीलाल मार्ग याठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर काही दिवसांतच 5 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्री बंगल्यावर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. फडणवीस स्वतः गाडी चालवत एकटे उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले. त्यांच्यात जवळपास 2 तास बैठक झाली. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे दुसऱ्याच दिवशी म्हणजे 6 ऑगस्ट् रोजी दिल्लीच्या दौऱ्यावर गेले. दिल्लीला जाताना त्यांच्यासोबत कोण-कोण होते, दिल्लीत त्यांनी कुणाच्या भेटीगाठी घेतल्या हे उद्धव ठाकरे यांनी जनतेला सांगावे, असेही त्यांनी म्हटले आहे.