Uddhav Thackeray : भ्रष्टाचाऱ्यांना हाकला, नाहीतर महाराष्ट्रातून पळता भुई थोडी होईल; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांविरोधात मुंबईत सोमवारी जोरदार आंदोलन केले. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करत, त्यांच्या स्वाभिमान आणि धैर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
ठाकरे यांनी थेट फडणवीसांना आव्हान देत म्हटले, “सत्ता येते आणि जाते, पण इतिहासात तुमची नोंद कशी होणार, हे महत्त्वाचे आहे. जर तुमच्यात थोडासाही स्वाभिमान आणि अभिमान शिल्लक असेल, तर दिल्लीच्या दबावाला बघू नका. नाहीतर खालचा जनतेचा दबाव वाढला, तर तुम्हाला महाराष्ट्रातून पळता भुई थोडी होईल!”
मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले की, मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते. तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे, वर दिल्लीत तुमचे बापजादे बसलेत, तरीही तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचाऱ्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायची. स्वतः भ्रष्टाचार केला नाही, मग का त्यांच्यासाठी बदनामी ओढवून घेता? का त्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरुण घालता? असे गंभीर आरोप ठाकरे यांनी केले.
पुढे म्हणाले की, एकदा स्पष्ट सांगा, हा भ्रष्टाचार तुम्हाला मान्य आहे की नाही? सांगता येत नाही आणि सहनही करता येत नाही, अशी तुमची अवस्था आहे का? जर तसे असेल, तर दिल्लीचा दबाव झटकून टाका आणि भ्रष्टाचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवा, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.
आमच्या काळातही आम्ही राजीनामे घेतले
ठाकरे यांनी महायुती सरकारवर जनताभिमुख नसल्याचा आरोप करत, त्यांना “पैसे गिळणारे सरकार” संबोधले. त्यांनी आपल्या कार्यकाळाचा दाखला देत सांगितले की, “आमच्या काळातही मंत्र्यांवर आरोप झाले, तेव्हा आम्ही त्यांचे राजीनामे घेतले. मी मुख्यमंत्री असताना एका वनमंत्र्याला वाईट वागणुकीमुळे वनवासात पाठवले.
पण हे सरकार भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालते.” ठाकरे यांनी माजी खासदार संजय राऊत यांनी उघड केलेल्या एका मंत्र्याच्या बार चालवण्याच्या प्रकरणाचा उल्लेख करत, “पुरावे देऊनही कारवाई होत नाही. रम्मी खेळणाऱ्या मंत्र्याला आता आवडीचे खाते मिळाले. सभागृहात रम्मी खेळता आणि शेतकऱ्यांची थट्टा करता. फडणवीस सांगतात, ‘आम्ही समज दिली.’ कसली समज? रम्मीऐवजी तीन पत्ती खेळा, अशी का?” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उपराष्ट्रपतींवरही निशाणा
उद्धव ठाकरे यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली. भ्रष्टाचारावर पुरावे देऊनही कारवाई होत नाही. मग उपराष्ट्रपतींना का समज दिली नाही? धनखड कुठे आहेत? त्यांना का सोडले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ठाकरे यांनी फडणवीस यांना भाजपच्या परंपरेचा आदर्श ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली, परंतु भ्रष्टाचाऱ्यांना मंत्रिमंडळात ठेवून तुम्ही ती परंपरा पायदळी तुडवत आहात, असा आरोप केला.





