शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाण्यात चिखली येथे शेतकरी मेळाव्याला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या आमदारांसह भापजलाही चांगलेच धारेवर धरले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी खासदार भावना गवळी यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. ताईंना आपणच दोनदा, चारदा, पाचदा, किती वेळा खासदार केलं, मात्र ताई मोठ्या हुशार त्यांनी काय केलं जाऊन थेट पंतप्रधानांना राखी बांधली, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
चिखली येथे शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी खासदार भावना गवळी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, “माहिती आहेत ना आपल्या ताई होत्या या ताई आहेत. आपणच त्यांना दोनदा चारदा, पाचदा, किती वेळा खासदार केलं तुम्हाला माहिती आहे? इथल्या सुद्धा गद्दारांना आणि आमदारांना तुम्हीच राबराब राबून आमदार आणि खासदार केलं होतं.”
“पण या ताईंना धमक्या देण्यात आल्या खास मुंबईवरनं दलाल इकडे पाठवले जायचे त्यांच्यावरचे सगळे आरोप वाचले गेले. त्यांच्या आजूबाजूची सगळी त्यांची जी काही होते त्यांना अटक झाली. पण ताई मोठ्या हुशार ताईंनी काय केलं जाऊन थेट पंतप्रधानांना राखी बांधली. ताईंनी तो राखी बांधल्याचा फोटो छापून आणला. आणि तो फोटो छापून आणल्यानंतर ईडी वाल्यांची, सीबीवाल्यांची हिंमत आहे का? या ताईला हे कळत नाही की लोकं हे सर्व बघत आहेत.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की,”ही जी काय तुमची चालूगिरी आहे, ही काय लोकं बघत नाही आहेत. म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने हे जे तमाम चाळीस रेडे म्हणा किंवा चाळीस गद्दारी त्यांना प्रश्न विचारतोय, मला प्रश्नाचं उत्तर पाहिजे. या इथला गद्दार खासदार आणि या इथले जे गद्दार आमदार आहेत, त्यांच्यामध्ये जर अजूनही मर्दानगी शिल्लक असेल तर त्यांनी जाहीर सांगावं की, आम्ही भाजपाच्या तिकिटावरती निवडणूक लढणार नाही. यांना नाव बाळासाहेबांचं पाहिजे, चेहरा बाळासाहेबांचा पाहिजे, शिवसेनेचं नाव पाहिजे आणि मोदींचा आशीर्वाद पाहिजे, मग मेहनत कुठे आहे तुमची? मेहनत कुठे आहे?”