Uddhav Thackeray : एकवेळ भाजप राहणार नाही, पण काश्मीर भारतातच राहील; उद्धव ठाकरे यांची खोचक टीका

मुंबई : काश्मीर हे कालही आपले होते, आजही आहे आणि उद्याही आपलेच राहील. एकवेळ भाजप देशात राहणार नाही, पण काश्मीर भारतातच राहील, अशी खोचक टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच आपला भाजपला वैचारिक विरोध आहे. मात्र देशावर संकट आले तर आम्ही पंतप्रधानांच्या पाठीशी उभे राहू. पण सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करणारच, अशी भूमिका त्यांनी मांडली.
शिवसेना भवनात आज ठाकरेसेनेच्या आमदार, खासदार आणि जिल्हाप्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यातील प्रश्नांवर चर्चा झाली. बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर टीका केली. तसेच वन नेशन वन इलेक्शन यावरही आपली भूमिका मांडली.
उद्धव ठाकरे म्हणाले, आमचे जहाज बुडणारे नाही. पण भाजपचे जहाज ओव्हरलोड झालेले आहे, त्यामुळे त्यांचे जहाज नक्कीच बुडणारे आहे. कारण अमित शहा हे तीन पक्षांचे प्रमुख आहेत. ते अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचेही प्रमुख आहेत. परंतु सत्ता येते-जाते. सत्ता आल्यावर हुरळून जायचे नाही आणि सत्ता गेल्यावर दु:खी व्हायचे नाही. याउलट परत सत्ता मिळवण्यासाठी कष्ट आणि प्रयत्न करायचे असतात. मात्र आपण ज्यांना खूप काही दिले ते पक्ष सोडून जात आहेत. पण ते सोडून गेले तरी आपल्या पक्षावर काही परिणाम होणार नाही. ज्याला सोडून जायचे आहे, त्यांना जाऊ द्या. कारण कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चा अभ्यास सुरु आहे, कमिटी महाराष्ट्रात आहे पण निवडणूक ही पारदर्शकपणे घ्या. वन नेशन वन इलेक्शन करतायत ते ठीक आहे. पण पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी प्रचारात उतरू नये, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.





