उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल ; म्हणाले,”मला हलताही येत नव्हतं त्यावेळी ‘त्यांच्या’ हालचाली सुरु होत्या”

मुंबई : राज्यात सध्या आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार आणि शरद पवार गट एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे शिवसेनेतील उद्धव ठाकरे गट व एकनाथ शिंदे गट यांच्यातील शाब्दिक चकमक अजूनही सुरूच आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका कार्यक्रमात उद्धव ठाकरेंना टोला लगावल्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी त्यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
शिंदे गट अल्पसंख्याक विभागाचा मेळावा काल मुंबईत पार पडला. यावेळी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली. “मला काहीही नशिबामुळे मिळाले नसून मी अतिशय मेहनत घेतो. नशिबाने एखादे वेळीच फळ मिळते. मी मुख्यमंत्री झाल्यामुळे अनेकजण घराबाहेर पडले. आता ते सगळीकडे फिरतायत”, असा टोला यावेळी शिंदेंनी लगावला होता.
एकनाथ शिंदेंच्या या टीकेला सध्या विदर्भ दौऱ्यावर असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी अमरावतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिलं. “त्यांचं असं म्हणणं असेल तर मी रुग्णालयात असताना रात्री हुडी घालून गुप्त बैठका कुणी घेतल्या? याचंही उत्तर त्यांनी द्यावं. मला हलताही येत नव्हतं हे खरं आहे. पण तेव्हा यांच्या हालचाली चालल्या होत्या. रात्रीच्या गाठीभेटी चालल्या होत्या. पूजाअर्चा चालल्या होत्या. त्याचं उत्तर त्यांनी द्यावं”, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना केले.
दरम्यान, सध्याच्या राजकीय परिस्थिती आपल्याला सामना चित्रपटाची आठवण झाल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला. “मला काल सामना चित्रपटाची आठवण आली. त्यात गाणं आहे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. तशी परिस्थिती आत्ताच्या सरकारची आहे”, असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ठाकरेंनी, “पूर्वी सरकार मतपेटीतून जन्माला यायचं, हल्ली सरकार खोक्यातून जन्माला येतंय. तुम्ही मतदान कुणालाही करा, सरकार माझंच येणार असा जर पायंडा पडला, तर उद्या कुणीही जो दमदाटी, पैशाचा खेळ करू शकतो, तो देशाचा पंतप्रधान किंवा राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. शिवसेना प्रमुखांनी तेव्हा राईट टू रिकॉलची कल्पना मांडली होती. आता नोटा आलंय, तसंच मी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीनी चूक केली असेल, त्याला परत बोलवण्याचा अधिकार द्यायला हवा का, यावर देशात विचार करायला पाहिजे”, असे म्हटले.





