MLC Tenure End : उद्धव ठाकरेंसह ९ आमदारांचा कार्यकाळ संपणार; ‘हे’ दिग्गज नेते होणार निवृत्त
MLC Tenure End : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपत आहे.
MLC Tenure End : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवट जवळ आला असतानाच विधानपरिषदेत मोठी घडामोड घडणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह एकूण नऊ आमदारांचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपत असून, या सर्वांना लवकरच विधानपरिषदेतून निरोप दिला जाणार आहे. त्यामुळे सध्याचे अधिवेशन हे त्यांचे शेवटचे अधिवेशन ठरणार आहे.
या पार्श्वभूमीवर लवकरच रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असून, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार राजकीय चुरस रंगण्याचे संकेत आहेत.
निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये विविध पक्षांचे प्रतिनिधित्व आहे. यात भाजपचे चार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक, शरद पवार यांच्या गटाचा एक आणि काँग्रेसचा एक सदस्य यांचा समावेश आहे.
निवृत्त होणाऱ्या प्रमुख सदस्यांमध्ये उद्धव ठाकरे, डॉ. नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, रणजितसिंह मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केनेकर यांची नावे आहेत.
हे सर्व सदस्य 14 मे 2020 रोजी निवडून आले होते. यापैकी काहींनी जवळपास सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला असला तरी काही सदस्यांना केवळ दीड वर्षाचा कालावधीच मिळाला आहे.
दरम्यान, विधानसभेतील संख्याबळानुसार एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी 28 आमदारांची आवश्यकता असते. त्यानुसार आगामी निवडणुकीत भाजपचे पाच, शिंदे गटाचे दोन, अजित पवार गटाचा एक आणि महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या सर्व घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचाल वाढली असून, निवृत्त होणाऱ्या सदस्यांपैकी कोणाला पुन्हा संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




