Shivsena UBT And MNS : उद्धव-राज युतीच्या पडद्यामागे हालचाली? अमित ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले, दोघे भाऊ….

Raj Thackeray Uddhav Thackeray : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना युतीच्या चर्चांना जोर मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “दोन्ही भाऊ एकत्र आले, तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण पुढाकार मी घेणार नाही,” असं म्हणत त्यांनी युतीसंदर्भातील चर्चांवर सूचक टिप्पणी केली आहे.
अमित ठाकरे म्हणाले, “आम्ही काही बोलून काही फरक पडत नाही. दोघांकडे एकमेकांचे नंबर आहेत. जर खरोखर इच्छा असेल, तर एकाने दुसऱ्याला फोन करावा. सकाळी उठून कोण काय बोलतं, त्यातून फारसं काही साधत नाही. दोघे भाऊ एकत्र यावेत हे त्यांनीच ठरवावं. राज ठाकरे यांची जी इच्छा असेल तीच माझी इच्छा असेल,” अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीबाबत चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं असताना, अमित ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे चर्चा आणखीच गडद झाल्या आहेत. त्यांनी सांगितलं की, “पुढाकार कोण घ्यावा हे मी ठरवू शकत नाही. माझ्याकडे तशी भूमिका नाही. दोघांचाही निर्णय हेच अंतिम ठरेल.”
राजकीय वर्तुळात अमित ठाकरे हे संयमित आणि मापात बोलणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या या विधानाला वेगळं महत्त्व आहे. त्यांच्या मतानुसार, युतीसाठी अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी पूर्णपणे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरच आहे.




