Udayanraje Bhosale: जिल्ह्यातील सर्व धरणांमधील गाळ काढा; खासदार उदयनराजेंची पाटबंधारे विभागाला सूचना
Udayanraje Bhosale: कोयनेसह साताऱ्यातील ४४ धरणांमध्ये केवळ १५ टक्के पाणी शिल्लक; पिण्याच्या पाण्याचे नियोजन करत तातडीने गाळ काढण्याची उदयनराजेंची मागणी.

Udayanraje Bhosale – तीव्र उन्हाळ्यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्व धरणांमधील पाणीसाठी नीचांकी पातळीच्याही खाली गेला आहे. धरणे उघडी पडण्याची विपरित परिस्थिती यापूर्वी कधीही उद्भवली नव्हती. पुढील काळात धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी सर्व धरणांमधील गाळ काढण्याचे काम त्वरित सुरू करावे. एकाच वेळी सर्व ठिकाणचा गाळ काढण्यासाठी लोकसहभागाची हाक द्यावी. स्थानिकांना शेतीच्या किंवा इतर उपयोगासाठी गाळ काढून नेण्याची मुभा द्यावी, अशी सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी पाटबंधारे विभागाला केली आहे.
याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात उदयनराजे यांनी म्हटले आहे की, यंदा मौसमी पावसाने ओढ दिली आहे. जून महिना संपत आला तरी पाऊस सुरू झालेला नाही. ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मिळून अवघा 20 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे या पाण्याचे नियोजन पिण्यासाठी करण्यात आले आहे. त्यामुळे 1972 च्या दुष्काळापेक्षा भयावह परिस्थिती ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात मोठे, मध्यम आणि लघु, असे एकूण 44 धरण प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांमध्ये मिळून फक्त 15 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कोयना धरणात केवळ आठ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने, सिंचनाचा आणि वीजनिर्मितीचा प्रश्न उद्भवणार आहे. सर्व धरणे उघडी पडल्याने, पूर्वीचे अवशेष दिसत आहेत. धरणांमधील गाळ अनेक वर्षे काढण्यात आला नसल्याने, साठवण क्षमता आकसली आहे.
पुढील काळात पाणीसाठा क्षमता वाढण्यासाठी धरणातील गाळ काढणे आवश्यक आहे. त्यामुळे गाळ काढण्याचे काम प्रशासनाने हाती घ्यावे. यामध्ये लोकसहभाग घ्यावा, स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांना हा गाळ शेतीसाठी नेण्याची परवानगी द्यावी. त्यातून स्थानिकांना रोजगार मिळेल आणि सर्व धरणांमधील जास्तीत जास्त गाळ काढला जाईल. या दृष्टीने प्रशासनाने ठोस कार्यवाही करावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.





